मुंबई - राज्यात धार्मिक स्थळे पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे. विरोधी पक्षांनी अनेक वेळा आंदोलनही केले असून सरकारवर टीकाही होत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धार्मिक स्थळे खुली करण्याबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. दिवाळीनंतर गर्दी टाळत आणि सामाजिक अंतर राखत धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी नियमावली तयार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. मंदिरे खुली करण्यास दिरंगाई करत असल्यावरून माझ्यावर टीका होत आहे मात्र, ही टीका झेलण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
टीका झेलण्यास तयार
नागरिकांचे संरक्षण होत असेल आणि आरोग्य सुरक्षित राहत असेल तर त्यासाठी मी विरोधकांची टीका झेलण्यासही तयार आहे. धार्मिक स्थळांवर नागरिकांची गर्दी रोखण्यासाठी, एकमेकांत अंतर राखण्यासाठी दिवाळीनंतर नियमावली तयार करण्यात येईल. धार्मिक स्थळी मास्क घालणे अनिवार्य असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. सर्वच धार्मिक स्थळांवर आरती वेळी किंवा दर्शन घेण्यास गेल्यावर कशी गर्दी होते, याचा धोका मुख्यमंत्र्यांनी सांगितला.
पाश्चिमात्य देशात कोरोनाची दुसरी लाट -
मुख्यमंत्री म्हणाले, जे काम केले आहे, ते चार दिवसांच्या फटाक्यांच्या धुरात वाहून जाता कामा नये. दिवाळी रोषणाई करून साजरी करा. पण फटाके मर्यादित वाजवा, इतरांना त्रास होऊ देऊ नका. पाश्चिमात्य देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे घरातही मास्क लावण्याची सक्ती आहे. 100 वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लू आला होता. तो दोन ते तीन वर्षांनी गेला. त्यावेळी 1 कोटी लोक बळी पडले होते. याची आठवण आपण ठेवली पाहिजे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करावे लागू नये. कोविड बेड रिक्त आहेत. ते रिक्तच राहावे, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रार्दुभाव आता जवळपास आटोक्यात आला असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. अनेकांनी टीका केल्या, पण आपण सर्वांनी जिद्दीने हा कोरोनाचा स्तर कमी केला आहे. राज्यात, मुंबईत रुग्णांचा आकडा कमी झाला आहे. दिल्लीत कोरोना वाढत आहे, कारण त्याठिकाणी प्रदूषण आहे. तसेच कोरोनाच्या दृष्टीने दिवाळीनंतरचे 15 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे दिवाळीत प्रदूषण करणारे फटाके टाळावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.