मुंबई - राज्यातील काही जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आलेख वाढतो आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील रुग्णसंख्येचा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी शुक्रवारी आढावा घेतला. दरम्यान, ज्या भागात रुग्णसंख्या अधिक आहे तेथे प्रभावी अंमलबजावणी करावी, चाचण्यांची संख्या वाढवावी, प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये कठोर उपाय योजना कराव्यात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करताना त्याचा अतिरेक होऊ देऊ नका, अशा सूचना कुंटे यांनी सर्व जिल्हाधिकार्यांना दिल्या आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभुमीवर मुख्य सचिव जिल्हानिहाय व्हर्चुअल प्रणालीद्वारे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याशी संवाद साधला. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी यावेळी उपस्थित होते.
अंमलबजावणी प्रत्यक्षात आणा
गेल्या काही जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचा दर जास्त आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णांच्या निकट सहवासितांची तपासणीचे प्रमाण वाढवावे. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावे, दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढवावी, प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या सुविधांचे अद्ययावतीकरण करावे, कंटेनमेंट झोनमधील उपाययोजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ कार्यवाही सुरु करावी, असे निर्देश कुंटे यांनी दिले.
नियम मोडणाऱ्यावर कारवाई करा
शहरी भागात महापालिका आणि पोलीस प्रशासनाने समन्वयाने काम करा. लोकांना कोरोना नियमांच्या सूचनांचे आवाहन करतानाच नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावे, मात्र त्याचा अतिरेक होऊ देऊ नका. तसेच ज्यांना गृह अलगीकरण केले आहे, त्यांचा दररोज आढावा घेऊन आरोग्य विषयक पाठपुरावा करावा, अशा सूचना दिल्या आहेत.
लसीकरणाचा वेग वाढवा
राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु असून प्रत्येक त्याला गती देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर लसीकरण मोहिम राबविण्यात यावी. त्याठिकाणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियमित भेटी देऊन लसीकरणाचा आढावा घेऊन त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत. तसेच ज्या जिल्ह्यांचा पॉझिटीव्हीटी दर जास्त आहे तेथे लसीकरण वाढविण्याकरीता अतिरिक्त साठा देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही देखील मुख्य सचिवांनी दिली आहे.
वर्षभराचा अनुभव कामी येईल
कोरोना प्रतिबंध नियमांचे प्रभावीपणे पालन करण्यासाठी 'मी जबाबदार' ही जागृतीची मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी. विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देशही मुख्य सचिवांनी यावेळी दिले आहेत. कोरोना प्रतिबंधाबाबत जिल्हा प्रशासनाला गेल्या वर्षभरापासूनचा अनुभव कोरोनाला रोखण्यास कामी येईल. मात्र मैदानात उतरुन कठोर नियमावलीची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन मुख्य सचिव कुंटे यांनी केले आहे.