मुंबई - राज्यात स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना राबविण्यास आज (दि. 16 सप्टें.) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीस आर्थिक अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल त्याचप्रमाणे विहित पद्धतीने विमा कंपन्यांची निवड करण्यात येईल.
या योजनेत महाराष्ट्रातील रस्त्यावर झालेल्या अपघातामधील व्यक्तींना याचा लाभ मिळेल. ही व्यक्ती कोणत्याही राज्य, देशाची असली तरी देखील त्यांना योग्य ते वैद्यकीय उपचार देण्यात येतील. अपघातग्रस्तांना तत्परतेने वैद्यकीय सेवा व आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेचा उपयोग होईल. आजमितीस राज्य महामार्ग तसेच ग्रामीण रस्त्यांवर अपघातात दरवर्षी सरासरी 40 हजार व्यक्ती जखमी तर 13 हजार व्यक्ती मरण पावतात. त्यांना वेळीच उपचार मिळाले तर त्यांचे प्राण वाचू शकले असते.
या योजनेत पहिल्या 72 तासांसाठी जवळच्या रुग्णालयांमधून उपचार करण्यात येतील. सुमारे 74 उपचार पद्धतीतून 30 हजार रुपयांपर्यंतचा खर्च मोफत केला जाणार आहे. यामध्ये अतिदक्षता विभाग व वॉर्डामधील उपचार, अस्थिभंग तसेच रुग्णालयाच्या वास्तव्यातील भोजन याचा समावेश असेल. यामध्ये औद्योगिक अपघात, दैनंदिन कामातील किंवा घरी घडलेले अपघात व रेल्वे अपघाताचा समावेश नाही. या योजनेसंदर्भात कोणतीही तक्रार नोंदविण्यासाठी टोलफ्री क्रमांक देखील असेल. राज्य आरोग्य हमी सोसायटी, वरळी यांच्यामार्फत ही योजना कार्यान्वित होईल, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - खूशखबर; राज्यात नवीन साडेबारा हजार पोलिसांची 'जम्बो भरती'