मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही विरोधक पुन्हा आक्रमक झालेले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्याच बरोबर वाढलेल्या गॅस दरवाढी संदर्भामध्ये घोषणाबाजी करत विरोधकांनी सरकारच्या विरोधात आंदोलन छेडले. रद्द करा रद्द करा गॅस दरवाढ रद्द करा.. बळीराजाला न्याय भेटलाच पाहिजे ... शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या.. महाराष्ट्राला द्या लाईट नाहीतर शेतकरी देतील फाईट.. सिलेंडर दरवाढ रद्द करा, नाहीतर खुर्च्या खाली करा.. अशा विविध घोषणांनी विधान भवन परिसर दणाणून सोडला होता. याचाच आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी.
मुख्यमंत्र्यांवर हक्कभंगाच्या प्रस्तावाची शक्यता : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हक्कभंगाचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवगर्जना यात्रे दरम्यान, विधिमंडळावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ते विधीमंडळ नाही ते चोरमंडळ आहे, असे ते म्हणाले. ही बनावट शिवसेना आहे तसेच ते ड्युप्लिकेट चोरमंडळ आहे, असे वादग्रस्त वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यांच्या विधानावरून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळ झाला. त्यामुळे अनेकदा विधिमंडळाचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. खासदार राऊतांच्या विधानाचे राज्यभर पडसाद उमटताना दिसत आहेत.
देवेंद्र फडणवीस आक्रमक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. कोणी कोणाला चोर मंडळ म्हणत असेल तर त्यापेक्षा घरी गेलेले बरे. राऊतांनी केलेला आरोप हा विधिमंडळावर केलेला आरोप आहे. यशवंतराव चव्हाणां सारखे मोठे नेते या विधिमंडळात होऊन गेले. विधिमंडळ मंडळ हे देशातील सर्वोच्च मानले जाते. इथे वेळोवेळी अधिवेशनादरम्यान सत्ताधारी - विरोधक भूमिका मांडत असतात. विधिमंडळावर आक्षेपार्ह बोलले तर कारवाई होते. तसे तर हजारो संजय राऊत विधिमंडळाचा अवमान करतील, झालेला हा अपमान खपवून घेणार नाही, यामुळे राऊतांच्या या विधानाचा आम्ही निषेध करतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
एकनाथ खडसेंची प्रतिक्रीया : सभागृह बंद करा अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. किती दिवसासाठी बंद करणार ही माहिती द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली होती. संजय राऊत सभागृहाचे सदस्य नाहीत. तरीही अशा शब्दांचा वापर केला. असे शब्द वापरणे योग्य नाही, तसे विधान खरे असेल तर निषेध आहे. सभागृहाला आठ दिवस सुट्टी द्यावी, अशी मागणी आमदार खडसे यांनी केली आहे. त्याशिवाय गोंधळ घालणार असाल, तर तुमचा हक्कभंग आम्ही फेटाळून लावू, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.
संजय राऊत यांना आमच्या ताब्यात द्या : भाजप आमदार निलेश राणे यांनीही आक्रमक होत, संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करायला हवी, अशी मागणी केली आहे. कारवाई केली गेली नाही तर संजय राऊत यांना आमच्या ताब्यात द्या, आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना समज देऊ, असा इशारा देखील नितेश राणे यांनी दिला आहे. संजय राऊत यांच्याकडून वारंवार विधिमंडळाचा अपमान केला जात असतो. ते स्वतः खासदार आहेत. असे वक्तव्य ते कसे करू शकतात? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारने संजय राऊत यांची सुरक्षा काढून टाकली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
हेही वाचा : Kasba Bypoll Result: भाजपाने पैशाचा पाऊस पाडला तरी माझा विजय निश्चित, रवींद्र धंगेकर यांच्या विश्वास