मुंबई - राज्य सरकारने दिलेले आश्वासने पूर्ण केले नसल्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत विरोधी पक्षांनी सभात्याग केला आहे. हे 'ठाकरे सरकार नसून फसवे सरकार' असल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केला आहे. तसेच यावेळी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून सातबारा कोरा केला नाही. सरकार येण्यापूर्वी दुष्काळग्रस्त व गारपीटग्रस्त भागाचा दौरा केला. त्यावेळी फळबाग शेतीसाठी हेक्टरी 50 हजार रुपये व इतर शेती उत्पादनासाठी हेक्टरी 25 हजार रुपये रोख मदत करू, सातबारा कोरा करू, संपूर्ण कर्जमाफी करू कर्जमुक्ती करू, अशी आश्वासने दिली होती. परंतु, सरकार येऊन शंभर दिवस पूर्ण होऊनही अजूनपर्यंत या सरकारने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे मदत केली नाही. कर्जमाफीची केलेली घोषणा ही फसवी असून अजूनपर्यंत काही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे हे 'ठाकरे सरकार' नसून 'फसवे सरकार' आहे, अशा प्रकारचा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विधानसभेच्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. तसेच सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत ठाकरे सरकारचा निषेध केला.
हेही वाचा -
आधारमुळं खरंच मिळाला 'आधार'; ४ वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा सापडला
७,७९६ कोटी रुपयांची खोटी जीएसटी बिले: अधिकाऱ्यांकडून 'गोरखधंदा' उघडकीस