मुंबई - कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. शतकातील आरोग्य विषयक आणीबाणी या आजाराने जगभर निर्माण केली आहे. मानवी जीवनाच्या अनेकविध क्षेत्रांवर दूरगामी परिणाम होत आहेत. मानसिक आरोग्यावरदेखील याचे विपरीत परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. अनपेक्षितपणे उद्भवलेल्या एखाद्या मोठ्या संकटामुळे अनामिक भिती, चिंता, ताण वाढतो आणि भविष्याबद्दलच्या अनिश्चिततेतून मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे "मानस मैत्र" ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली आहे.
अंनिसतर्फे मानसिक आरोग्य विभाग हा स्वतंत्र विभाग काय करतो या विभागामार्फत चाळीसगाव (जि. जळगाव) येथे गेली १० वर्षे मानसिक आधार केंद्र चालविले जाते. या ठिकाणी समितीचे प्रशिक्षीत मानसमित्र ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रदीप जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विनामूल्य सेवा देतात. मराठवाड्यातील भूकंपग्रस्त जिल्ह्यांत आणि विदर्भ-मराठवाडा-खान्देशातील शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नाबाबत देखील या स्वरुपाचे मानसिक आधाराचे काम समितीतर्फे चालविले गेले होते. त्याचा खूप चांगला उपयोग झाला होता असे समितीचे राज्य प्रधान सचिव नंदकिशोर तळाशिलकर यांनी सांगितले.
सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि लॉकडाऊन परिस्थितीत घरातच कोंडले गेल्यासारखी स्थिती असल्याने चिंता, अस्वस्थता वाटणे, स्वत:ची कुटूंबीयांची काळजी वाटणे, ताण येणे, घरात एकट्याच असलेल्या व्यक्तींना अस्वस्थ वाटणे, भविष्याच्या अनिश्चिततेमुळे आणि पुढील काळातील रोजगार, उद्योग व्यवसाय, आर्थिक मंदी या सारख्या प्रश्नांमुळे अनामिक भिती, दडपण येणे या सारख्या तक्रारी वाढल्या आहेत. अशा स्वरुपाच्या मानसिक अवस्थेचे पुढे गंभिर आजारात रुपांतर होऊ शकते. पण यावेळी अशा व्यक्तींना आवश्यक भावनिक आधार व धीर मिळाला तर निश्चितच ते या स्थितीतून बाहेर यायला मदत होऊ शकते. खरे तर प्राथमिक स्तरावर त्यांचे मनमोकळे ऐकून घेणे, त्यांना भावनिक, मानसिक आधार व धीर देणे, गरजेनुसार समुपदेशन व त्यानंतर आवश्यकता असल्यास प्रत्यक्ष औषधोपचार अशा याच्या पायऱ्या आहेत.
त्यातील भावनिक आधाराच्या टप्प्यावरच अनेक व्यक्तींना मोठा फायदा होऊ शकतो. याचसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे "मानस मित्र" हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. हेल्पलाईनसाठी मानस मित्र/मैत्रिणींचे मोबाईल नंबर समाजमाध्यमांद्वारे पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.
खान्देश विभाग- विनायक सावळे (शहादा जि. नंदुरबार) मो.क्र. ९४०३२५९२२६, विदर्भ विभाग सचिन मेश्राम (वर्धा) मो.क्र. ९३७२०६३४३५, पश्चिम-दक्षिण महाराष्ट्र कृष्णात स्वाती मो.क्र. ८६००२३०६६० आणि मुंबई-ठाणे-कोकण विभाग सुरेखा भापकर मो.क्र. ९३२३६१६९४१ हे "मानस मित्र" हेल्पलाईनचे समन्वयक म्हणून काम पहात आहेत. तरी गरजूंनी या हेल्पलाईनचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र अं.नि.स.चे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले आहे.