मुंबई - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने मंजूर केलेल्या तीनही कृषी कायद्यांची आज मुंबईत संयुक्त शेतकरी, कामगार महामोर्चाच्या नेत्यांनी होळी करून सरकारच्या विरोधात तीव्र घोषणा दिल्या. यावेळी मोर्चाचे प्रमुख कॉम्रेड अशोक ढवळे, कॉम्रेड प्रकाश रेड्डी, सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण, जनता दलाचे प्रभाकर नारकर आदी नेत्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत 24 जानेवारीपासून महामुक्काम आंदोलन छेडले जाणार असून त्यासाठीची तयारीची आज या संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. मुंबईत सुरू केल्या जाणाऱ्या महामुक्काम आंदोलनाची सुरुवात 23 जानेवारीपासून होणार असून राज्यभरातून शेतकरी, कामगार, विद्यार्थी, शिक्षक आणि महिला संघटनांचे हजारो प्रतिनिधी मुंबईच्या दिशेने विविध वाहने घेऊन येणार आहेत. तर 24 जानेवारीपासून मुंबईत हे महा मुक्काम आंदोलन सुरू होणार असून 25 जानेवारीला राजभवनावर महामोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच डाव्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांसह विविध सामाजिक संघटनांचे प्रमुख नेते सहभागी होणार असल्याची माहिती आज संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा चे प्रमुख कॉम्रेड अशोक ढवळे यांनी दिली.
मुंबईत राजभवनावर मोर्चा
शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेला राज्यातील डाव्या पक्षांच्या विविध प्रमुखांसह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस जनता दलासह शेतकरी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 23 ते 26 जानेवारी या काळात देशातील सर्व राज्यातील राजधान्यामध्ये असलेल्या राजभवनावर आंदोलन करण्याची हाक दिल्लीतील शेतकरी आंदोलकांनी दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत राजभवनावर हा मोर्चा काढला जाणार असून यासाठी राज्यातील विविध समविचारी किसान कामगार संघटना तसेच सामाजिक व राजकीय संघटना एकत्र येऊन हे आंदोलन संपूर्ण ताकदीनिशी करणार असल्याची माहितीही ढवळे यांनी यावेळी दिली. या आंदोलनासाठी 23 जानेवारी रोजी राज्यातील विविध भागातून ट्रॅक्टर्स व इतर वाहनांमधून हजारो सैनिकांसह शेतकरी महिला मुंबईच्या देशाने दिशेने निघणार आहेत. तर 24 जानेवारी रोजी मुंबईतील आजाद मैदान येथे सर्वजण एकत्र येऊन 25 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता राजभवनच्या दिशेने हे आंदोलक करतील तर 26 जानेवारी रोजी शेतकरी कामगार तर्फे आझाद मैदानात राष्ट्रीय ध्वजवंदन केले जाईल आणि त्यानंतर या महामुक्काम आंदोलनाची सांगता होईल अशी माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत
यामहा मुक्काम आंदोलनाच्या या पार्श्वभूमीवर संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाकडून केंद्र सरकारने लागू केलेले तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत यासाठीचा एक ठराव विधान महाराष्ट्र विधानसभेने मंजूर करावा, तसेच एक विशेष सत्र बोलावून शेतकऱ्यांना किमान आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा व इतर निर्णय घ्यावेत, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली त्यासोबतच केंद्र सरकारने लागू केलेले कामगार कायदे तातडीने रद्द करावेत तसेच नवीन शैक्षणिक धोरण की तत्काळ रद्द करावे आदी मागण्या यावेळी केल्या जाणार आहेत.