मुंबई - कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी #mahacovid मोहीम सुरू आहे. राज्याच्या विविध भागातील तरुणांनी एकत्र येत ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून रुग्णांच्या नातेवाईकांपर्यंत रेमडेसिवीर, ऑक्सिजन बेड, प्लाझ्मा, रक्तासह आदी कोविडविषयक सेवांविषयी माहिती पोहोचण्यात येत आहे.
सोशल मीडियाचा सकारात्मक वापर -
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. अनेक रुग्णांना रेमडेसिवीर किंवा ऑक्सिजन बेडसाठी फिरावे लागत आहे. अश्या परिस्थितीत रेमडेसिवीर किंवा ऑक्सिजन बेड कुठे उपलब्ध आहे, याची माहिती योग्य वेळेत रुग्णांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागतात. परंतु अश्या वाईट परिस्थितीत महाराष्ट्रातील तरुण एका कोविड योध्याप्रमाणे पुढे आला आहे. या तरुणांनी ट्विटर, फेसबुक व्हाट्सएपच्या यासारख्या सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून #mahacovid ही चळवळ उभी केली आहे, ज्याद्वारे रेमडेसिवीर किंवा ऑक्सिजन बेड, प्लाझ्मा, रक्त तसेच रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत जेवण यासारख्या विविध कोविडविषयक सेवा एका हॅशटॅगवर उपलब्ध झाल्या आहेत.
मराठी कलाकारांचाही #mahacovid ला पाठिंबा -
महाराष्ट्रावर वाईट परिस्थिती आली असताना राज्यातील मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार पुढे आले आहेत. अभिनेता स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी, संदीप पाठक आदी कलाकारांनी या चळवळीला पाठिंबा दिला आहे. अभिनेता स्वप्नील जोशीने ट्विट करत 'पुढील काही दिवस मला राजकारण, मनोरंजन आदी पोस्टमध्ये टॅग न करता, केवळ कोविडविषयक पोस्टमध्येच टॅग करावे, असे म्हटले आहे.

मदत लागल्यास काय करावे -
राज्यात कुठेही कोविडविषयक मदत लागल्यास तुम्हाला ट्विटर, फेसबुक सारख्या सोशल माध्यमावर जाऊन तुम्हाला काय मदत हवी ते लिहावे. सोबतच #mahacovid हा हॅशटॅग जोडावा, जेणेकरून तुम्हाला मदत मिळणे सोपे जाईल.
हेही वाचा - टाटा स्टीलकडून आठवडाभरात ऑक्सिजनची दुप्पट निर्मिती; रोज 600 टनचा पुरवठा