मुंबई : सरकारच्या निर्णयामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे. यंदा शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासोबतच महाराष्ट्राची लोकसंस्कृती, ऐतिहासिक वारसाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि पर्यटनवाढीसाठी राज्याच्या पर्यटन विभागाने कंबर कसली आहे.
तीन दिवस जन्मोत्सव साजरा केला जाणार : या पार्श्वभूमीवर किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीन दिवस जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर तालुक्यातील 'शिवकालीन गावात' प्रथम 'महाशिव आरती', शिव वंदना, स्थानिक, पारंपरिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अजित पवार, उपसभापती निलम गोऱ्हे, खासदार उदयनराजे भोसले यावेळी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील शिवप्रेमींसाठी पर्वणी असणार आहे, असा दावा मंत्री लोढा यांनी केला आहे. तसेच, किल्ले शिवनेरीवरील कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले.
विरोधकांनी खपल्या काढू नये : छत्रपती शिवाजी महाराज यांची आजवर कधीही महाआरती झाली नव्हती. राज्यपालांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला अवमान, त्यामुळे भाजपची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी भाजपकडून छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे का, असा प्रश्न विचारला असता, भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी चोख प्रत्त्युत्तर दिले. दरेकर म्हणाले की, शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. हिंदवी स्वराज्याचे दैवत आहे. ही प्रत्येक गोष्ट राजकारणाशी जोडू नका, अशी विनंती केली.
शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे आयोजन : तसेच, भाजप एवढा कमकुवत झालेला नाही. छत्रपती आराध्य दैवत आहेत, जुन्या खपल्या काढून गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन दरेकर यांनी विरोधकांना केले. तसेच, किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. जाणता राजा हा प्रयोग पाहता येणार आहे. हा राज्य सरकारचा कार्यक्रम असून, कुठेही भाजपाचा उल्लेख नाही. विरोधकांनी भाजपवर विनाकारण आरोप करणे टाळावे, असे आवाहन दरेकर यांनी केले.
भगवा झेंडा लावणारच : किल्ले शिवनेरीवर झेंडा लावण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. सरकारने अद्याप अंमलबजावणी केलेली नाही. खासदार अमोल कोल्हे यांनी यामुळे शिवनेरीवर जन्मोत्सवाला जाणार नाही, अशी भूमिका घेतली. मंत्री लोढा यांनी, स्थानिक खासदार कोल्हे यांची मनधरणी करणार असल्याचे सांगितले. हा किल्ला एएसआयकडे आहे. त्यामुळे आम्ही किल्ल्यावर भगवा झेंडा कायमस्वरूपी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाही मंत्री लोढा यांनी दिली. तसेच, शिवनेरी किल्ल्यावर ९० कोटी रुपये खर्च केल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.
असा असेल कार्यक्रम : १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:३० वाजता ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२३’ चे उद्घाटन होणार आहे. सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेदरम्यान दिग्दर्शक अशोक हांडे यांचा 'मराठी बाणा' कार्यक्रम होईल. दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११ वाजेदरम्यान किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा केला जाणार आहे. ३ ते ५ वाजेदरम्यान शिववंदना करण्यात येणार आहे. सायंकाळी ६:१५ ते ७ वाजेदरम्यान महाशिवआरती कार्यक्रम होणार आहे. सायं. ७ ते रात्री १० वाजेदरम्यान ‘जाणता राजा’ या महानाट्याचा कार्यक्रम केला जाणार आहे. तर २० फेब्रुवारी रोजी सायं.७ ते रात्री १० वाजेदरम्यान जाणता राजा कार्यक्रम होईल. तीनही दिवशी विविध बचतगटांची उत्पादने व खाद्यपदार्थांच्या ३०० स्टॉलचे प्रदर्शन भरवण्यात येणार असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.