मुंबई - पंतप्रधान प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख देणार, या विषयावर विरोधकांनी मोदी यांच्या विरोधात रान उठवले असताना, मोदी यांनी कधीही, असे आश्वासन जनतेला दिले नाही. असे आश्वासन त्यांनी कुठे दिले असेल, तर विरिधकांनी ते स्पष्ट करावे, असे आव्हान भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण यांनी केले आहे. ते दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात भाजप आणि शिवसेनेच्या संयुक्त निर्धार मेळाव्यात बोलत होते.
मधु चव्हाण म्हणाले, या मेळाव्यात सर्व कार्यकर्त्यांनी आणि शिवसैनिकांनी एक दिलाने काम करावे. प्रचाराचे काम करताना अनेक जण तुम्हाला १५ लाख रुपयांबाबत विचारणा करतील. मात्र, त्यांना त्याचे उत्तर देताना मोदींनी, असे आश्वासन कधी दिलेच नव्हते. विरोधकांनी मोदी यांच्या विरोधात हा अपप्रचार चालवला असल्याचे चव्हाण म्हणाले.
अनेक दुरचित्रवानी वाहिन्यांच्या चर्चेतही या विषयी विचारणा होत असते. मात्र, टीव्ही वाहिन्यांकडे मोदी यांच्या आश्वासनांचे पुरावे नाहीत, असेही चव्हाण यांनी सांगितले. दक्षिण मुंबई मतदार संघात शिवसेनेचे अरविंद सावंत निवडणूक लढवत आहेत. ते सेनेचे जरी असले तरी आता ते मोदींचे उमेदवार असल्याचे त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितले आहे.
या कार्यक्रमाला उमेदवार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, आमदार मंगल प्रभात लोढा, राज पुरोहित सेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ उपस्थित होते. तसेच भाजपचे जेष्ठ नेते आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे उशिरा या मेळाव्यात सहभागी झाले.