मुंबई - म्हाडा वसाहतीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी म्हाडा प्रशासन कडक उपाययोजना अवलंबणार आहे. याची पहिली सुरुवात गोरेगाव येथील मोतीलाल नगरपासून होणार आहे. हे नगर अनधिकृत बांधकामांचे आगार बनले आहे. काही महिन्यांपूर्वी अनधिकृतपणे बांधकाम सुरु असताना झालेल्या दुर्घटनेत दोन कामगार मृत्युमुखी पडले होते. या घटनेची दाखल घेऊन म्हाडाने मोतीलाल नगरमधील अनधिकृत बांधकामांवर पंधरा दिवसात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह अनधिकृत बांधकामास पाठबळ देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.
गोरेगाव पश्चिमेतील मोतीलाल नगर-३ मध्ये अनधिकृत बांधकामाच्या तक्रारीकडे म्हाडा अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष दिले असते तर दुर्घटना टळली असती. पण म्हाडाचे आता डोळे उघडले असून या बांधकामावर कारवाईचा बडगा उचलला आहे. म्हाडाच्या वसाहती जिथे आहेत तिथे अनधिकृत बांधकाम झाले आहे, अशा बांधकामावर आम्ही कारवाई करणार आहोत. मोतीलालनगर ही फक्त कारवाईची सुरुवात आहे. यानंतर सर्व ठिकाणी कारवाई करणार आहोत, असे म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितले.