मुंबई- वाढत्या महागाईमध्ये सामान्य जनतेला आणखी एक झटका बसला आहे. पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत. एलपीजी गॅस किंमतीत सोमवारी २५ रुपयांची वाढ झाली आहे. दे. गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत तीन वेळा वाढ झाली होती. केवळ फेब्रुवारीमध्ये सिलिंडर १०० रुपयांनी महाग झाले होते. फक्त २६ दिवसांत एलपीजी १२५ रुपयांनी महागला आहे.
२५ रुपयांनी गॅस सिलिंडर महाग
दर महिन्याच्या सुरूवातीला एलपीजी सिलिंडरच्या किंमतींचा आढावा घेतला जातो आणि त्यानंतर किंमती निश्चित केल्या जातात. आयओसीने फेब्रुवारी महिन्यात १४.२ किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत तीन वेळा वाढ केली. प्रथम ४ फेब्रुवारीला, दुसऱ्यांदा १४ फेब्रुवारीला आणि तिसऱ्यांदा २५ फेब्रुवारीला किंमत २५ रुपयांनी वाढविण्यात आली. आज मार्चच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडर २५ रुपयांनी महाग झाला आहे. दिल्लीत अनुदानित एलपीजी सिलिंडर आता २५ रुपयांनी महाग झाला असून तो ८१९ रुपयांना मिळणार आहे. पूर्वी ते ७९४ रुपये होता. त्याचप्रमाणे मुंबईतही एलपीजी सिलिंडरसाठी ८१९ रुपये द्यावे लागतील. एलपीजी सिलिंडरसाठी कोलकाताला जास्तीत जास्त ८४५.५० रुपये द्यावे लागतील, चेन्नईमध्ये ग्राहकांना एलपीजी सिलिंडरसाठी ८३५ रुपये द्यावे लागतील.
देशातील प्रमुख शहरातील गॅस सिलेंडरचे दर
दिल्ली - ८१९
मुंबई - ८१९
कोलकाता - ८४५.५०
चेन्नई - ८३५
फेब्रुवारी महिन्यात गॅस सिलेंडर किंमतीमध्ये तीन वेळा वाढ
एलपीजी सिलिंडरच्या किंमती डिसेंबरमध्ये दोनदा वाढविण्यात आल्या. १ डिसेंबर रोजी सिंलडरचा दर ५९४ रुपयांवरून ६४४ रुपये करण्यात आला आणि नंतर १५ डिसेंबरला त्याची किंमत पुन्हा वाढवून ६९४ रुपये केली गेली. म्हणजेच एका महिन्यात १०० रुपयांची वाढ झाली. परंतू जानेवारीत किंमती वाढविण्यात आल्या नाहीत. जानेवारीत विना अनुदानित एलपीजीची (१४.२ kg) किंमत ६९४ रुपये होती. फेब्रुवारीच्या सुरूवातीस, घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ केली गेली नव्हती आणि ती केवळ त्याच्या जुन्या किंमत ६९४ रुपयांत उपलब्ध होता.