मुंबई - अर्थसंकल्प अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. हा दिवस राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या बाबतीत चर्चेत राहिला गेला. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये महिलांच्या विरोधात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे सभागृहामध्ये या सर्व संदर्भात विरोधकांनी आवाज देखील उठवला गेला होता. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जे संशयास्पद स्कॉर्पिओ गाडी सापडली होती, त्यामध्ये जिलेटिनच्या कांड्या होत्या, त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू हा ठाण्याजवळील मुंब्रा तेथे झाला आहे, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.
मनसुख हिरेन हे मुकेश अंबानी यांच्या प्रकरणातील सर्वात मुख्य साक्षीदार होते आणि त्यांना सुरक्षा देण्याची मागणी आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली होती आणि ही मागणी केल्यानंतरच थोड्याच वेळात त्यांच्या मृत्यूची बातमी ही देवेंद्र फडणवीस यांना आली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी पक्षांवर हल्लाबोल चढवत या मृत्यूला सरकार जबाबदार आहे, असे सांगितले.
या सगळ्या प्रकरणात संदर्भात भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी आपल्याशी बोलताना सांगितले की, या सरकारचा कोणालाही कोणत्या मंत्र्यांचा ताळमेळ राहिलेला नाही. त्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. परंतु, तरीदेखील सरकार ही गोष्ट गांभीर्याने घेत नाही. या सरकारला पोलिसांच्या बदल्या करण्यामध्ये रस आहे. परंतु, महाराष्ट्रातील महिला भगिनींची सुरक्षा करण्यासाठी वेळ नाही आहे. मनसुख हिरेन यांचा मृत्यू होतो ही गोष्ट विरोधी पक्षाला अगोदर कळते, नंतर सत्ताधाऱ्यांना कळते तर सत्ताधाऱ्यांचा सत्तेत राहून काय उपयोग? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.