मुंबई - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीचे निमित्त तसेच रविवार हा सुट्टीचा दिवस लोकसभेच्या उमेदवारांना लाभदायक ठरला. अनेक ठिकाणी जयंतीच्या निमित्ताने शेकडोचे घोळके उमेदवारांना एकाच ठिकाणी मिळाले. तर मतदारसंघात सुट्टीमुळे उमेदवारांना थेट मतदारांची भेट घेता आली.
दक्षिण मुंबईतही काँग्रेसचे खासदार मिलिंद देवरा यांनी सकाळी मुंबई प्रदेश कार्यलयात पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच चैत्यभूमीवर जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन केले. त्यांचा मतदारसंघातल्या प्रचार दौऱ्यावर भर होता. काळबादेवी आणि मुंबादेवी परिसरात त्यांनी व्यापाऱ्यांचीही भेट घेतली. शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांनीही रविवारी सकाळीच आपली प्रचार फेरी सुरू केली. खेतवाडी, व्ही. पी. रोड परिसरात मतदारांची भेट घेतली. संध्याकाळी अक्कलकोट मठ, सी पी टँक परिसरात घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली. एकीकडे सर्वच पक्ष सध्या सोशल मीडियावर भर देत असताना, मतदारांचा नेमका कौल आणि स्थिती जाणून घेण्यासाठी थेट भेट आवश्यक असल्याचे शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी सांगितले.