मुंबई - महानगरामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. विशेष म्हणजे मुंबईमधील उत्तर मुंबईतील कांदिवली ते दहिसर या विभागात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. यामुळे पालिकेने कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या विधी समितीच्या अध्यक्षा व दहिसर येथील नगरसेविका शितल म्हात्रे यांनी दिली.
मुंबईत उत्तर मुंबईत कांदिवली, बोरिवली, दहिसर हे विभाग कोरोनाचा हॉट स्पॉट बनले आहेत. कांदिवलीत 2090, मालाडमध्ये 3378 रुग्ण,बोरिवली 1825, दहिसरमध्ये 1274 रुग्ण आहेत. या 4 विभागात रुग्णदुप्पटीचा कालावधी कालावधी 15 ते 20 दिवस आहे. या विभागात कमी दिवसात रुग्ण वाढ होत असल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर या विभागात झोपडपट्टी आणि चाळीत 115 कंटेनमेंट झोन आहेत. 908 इमारती पूर्णपणे तर काही अंशी सील करण्यात आल्या आहेत. कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर या विभागात झोपडपट्टी आणि चाळीत कंटेनमेंट झोन असले तरी त्याचे पालन योग्य प्रकारे होत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे पालिका आणि पोलिसांनी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रुग्णांची संख्या कमी करण्यात यश येईल, असे पालिकेचे म्हणणे आहे.
लॉकडाऊनचे नियम नागरिकांकडून पाळले जात नाहीत. यामुळे कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर या विभागात रुग्ण वाढत असल्याची परिस्थिती आहे. पालिका पोलिसांच्या सहाय्याने या विभागात पूर्ण लॉकडाऊन करणार आहे याची माहिती नगरसेवकांना देण्यात आलेली नाही ही माहिती चुकीची आहे. कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे पालिकेला रुग्ण संख्या कमी करण्यात नक्की यश येईल असे विधी समितीच्या अध्यक्षा व दहिसर येथील नगरसेविका शितल म्हात्रे व नगरसेविका सुजाता पाटेकर यांनी दिली.