मुंबई - राज्यात ब्रेक द चैन अंतर्गत मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट सध्या (३.७९) टक्के असून (२३.५६) टक्के रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत. रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात मुंबईचा समावेश पहिल्या स्थरात झाला आहे. तरीही मुंबईमध्ये तिसऱ्या स्थराचेच निर्बंध आठवडाभर लागू राहतील. तसेच, येत्या चार आठवड्यात मुंबईमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये लोकल ट्रेनमधून सर्वसामान्य नागरिकांना प्रवासाची मुभा देता येणार नाही, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
'निर्बंध शिथिल होणार, लोकल प्रवास नाहीच'
राज्यात ब्रेक द चैन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये ७ जूनपासून शिथिलता देण्यात आली आहे. मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट (५.२५) इतका होता. मागील आठवड्यात हा रेट (४.४०) इतका झाला होता आता त्यामध्ये आणखी घसरण झाली असून, सध्या (३.७९) टक्के इतका पॉझिटिव्हिटी रेट आहे. तसेच, (२३.५६) टक्के इतकेच ऑक्सिजन बेडवर रुग्ण असल्याने, रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात मुंबईचा समावेश पहिल्या स्थरात झाला आहे. मुंबई पहिल्या स्थरात असली तरी, मुंबईची लोकसंख्या पाहता आणि कोरोची तिसरी लाट लक्षात घेता, सध्यातरी तिसऱ्या स्थराचेच निर्बंध कायम राहणार आहेत. पुढील आठवड्यात कोणते निर्बंध शिथिल करावेत यासाठी उद्या बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहितीही काकाणी यांनी दिली. मुंबईमध्ये लोकल ट्रेनने लांबून लोक येतात. ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दी असते. येत्या काही दिवसांत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. लोकल ट्रेनमधून सामान्य प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा दिल्यास कोरोनाचा प्रसार होण्याची भीती असल्याने, सध्यातरी लोकल ट्रेनमधून प्रवासाची मुभा देता येणे शक्य नसल्याचे सुरेश काकाणी यांनी संगितले.
'मुंबईचा स्थर उंचावला'
कोरोनाची दुसरी लाट आल्याने आणि रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने १४ एप्रिल पासून राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला. रुग्णसंख्या कमी झाल्याने, ७ जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. यामध्ये सरकराने पाच स्थर निश्चित केले आहेत. त्याप्रमाणे नियमही सरकराने आखून दिले आहेत. देशाला मुंबई मॉडेलचे धडे देणारी मुंबई मात्र, तिसऱ्या स्थरात होती. मुंबईत ४ जून पर्यंत (५.२५) टक्के इतका पॉझिटिव्हिटी रेट होता. ४ जून ते ११ जून या आठ दिवसांत (४.४०) टक्के इतका रेट कमी झाला. ११ जून ते १८ जून या आठ दिवसात पॉझिटिव्हिटी रेट आणखी कमी होऊन (३.७९) टक्के इतका झाला.
'पॉझिटिव्हिटी रेट घसरला'
मुंबईत ४ ते ११ जून या आठ दिवसांच्या कालावधीत २ लाख ६९ हजर ५६९ चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ११ हजार ८७८ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. यामुळे पॉजिटिव्हिटी रेट (४.४०) टक्के इतका होता. याच कालावधीत १२ हजार ५९३ ऑक्सिजन बेड्सपैकी ३ हजार ४१६ बेड्सवर रुग्ण होते. तर ९ हजार १७७ बेड्स रिक्त होते. एकूण बेड्स पैकी (२७.१२) टक्के बेड्वर रुग्ण होते. यामुळे मुंबईचा समावेश दुसऱ्या स्थरात झाला होता. आता ११ ते १८ जून या कालावधीत १२ हजार ५९३ पैकी ९ हजार ६२६ ऑक्सिजन बेड रिक्त आहेत. २ हजार ९६७ ऑक्सिजन बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत (२३.५६) टक्के बेडवर रुग्ण असल्याने, राज्य सरकारच्या ब्रेक द चैन नियमानुसार मुंबईचा समावेश पहिल्या स्थरात झाला आहे.