मुंबई - एकीकडे मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी सुरू आहे. सर्वसामान्य जनतेचे वाहतुकीचे सर्व मार्ग रोखण्यात आले आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवस लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत मुंबईत आता रोजगार नाही आणि त्यातच कोरोनाची लागण होण्याची भीती यामुळे इतर राज्यातील कामगार मुंबईतून पलायनाच्या प्रयत्नात आहेत.
परप्रांतीय कामगार मुंबई सोडण्याचा विविध मार्गानी प्रयत्न करत आहेत. अशातच उत्तर प्रदेशच्या कामगारांनी भरून निघालेला टेम्पो मुलुंडच्या आनंदनगर टोलनाक्यावर काल रात्री उशिरा अडवण्यात आला. या टेम्पोतून 64 लोक उत्तरप्रदेशला निघाले होते. त्यांना अडवून नवघर पोलिसांनी चालक-मालकासह 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सर्व कामगारांना परत मुंबईत पाठवले आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार मुंबईत वाढत आहे. यातच लॉकडाऊनचा काळही वाढणार असल्याचे संदेश समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. यामुळे असंघटित कामगार भयभीत झाले आहेत. हाताला काम नाही, काम चालू होण्यातील अनिश्चितता आणि कोरोनाची लागण होण्याची भीती यामुळे मिळेल त्या वाहनाने कामगार आणि चाकरमानी मुंबई सोडून गाव जवळ करत आहेत.
पूर्व उपनगरातील मुलुंडच्या आनंदनगर टोल नाक्यावर काल रात्री पकडलेल्या टेम्पोतील सर्व कामगार मुंबई च्या मुंबादेवी परिसरात रहातात. तिथे हातगाडी चालवणे, इतर मिळेल ते काम ते करत होते. मात्र कामच नसल्याने मुंबईत जगायचे कसे, हा प्रश्न त्यांच्यासमोर ठाकला आहे. अखेर त्यांनी टेम्पो चालक फारुख शेख याला सोबत घेऊन एका एशर टेम्पोमधून उत्तर प्रदेश गाठण्याचा निर्णय घेतला. हा प्रवास कमीत कमी 3 दिवस चालणार होता. मात्र, एवढ्याशा जागेत कसेबसे कोंबून बसून या 64 जणांनी प्रवास सुरु केला खरा. परंतु, मुंबईच्या वेशीवरच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी टेम्पोचा चालक, मालक, या लोकांना काम देणारे व्यक्ती अशा चार जणांवर नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या सर्वांना रात्री पुन्हा कुंभारवाडा येथे सोडण्यात आले.