मुंबई Letter To Lalbaugcha Raja : मुंबईतील जगप्रसिद्ध 'लालबागच्या राजा'चं दर्शन भाविकांसाठी खुलं करण्यात आलंय. नेहमीप्रमाणे थाटात बसलेला लाडक्या राजाचं काल भाविकांना प्रथम दर्शन झालं. यंदा 'लालबाग राजा सार्वजनिक मंडळा'ला ९० वर्ष पूर्ण होत असून, देखावा म्हणून शिवकालीन रायगडाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. यासोबतच स्टेजवर शिवमुद्रा देखील साकारण्यात आली आहे.
नागपूरच्या भाविकानं लिहिलं पत्र : दरम्यान, यंदाचा 'लालबागचा राजा' एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आलाय. एका नागपूरच्या भाविकानं लालबागच्या राजाला भावनिक पत्र लिहून पुन्हा नोकरी मिळावी, अशी मागणी केली आहे. हे पत्र ईटीव्ही भारतच्या हाती लागलंय. काय आहे या पत्रात हे पाहूया..
कंपनीत चोरी केल्याचं बाप्पाकडे कबूल केलं : नागपूरला राहणारे सदाशिव (नाव बदललेलं) एका खाजगी पेट्रोलियम कंपनीत काम करत होते. मात्र तिथे गैरप्रकार केल्यामुळे त्यांना आपली नोकरी गमवावी लागली. त्यांच्या घरी पत्नी, तीन मुली आणि दोन मुलं असा मोठा परिवार आहे. नोकरी गेल्यामुळे त्यांना आर्थिक चणचण भासू लागली होती. त्यामुळे सदाशिव यांनी बाप्पाकडे कंपनीत चोरी केल्याचं कबूल केलं. माझ्याकडून मोठी चूक झाली असल्याचं त्यांनी बाप्पाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. 'लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा'ला हे पत्र मिळालं आहे. सदाशिव हे गणेश चतुर्थीला त्यांच्या मालकाला भेटायला जाणार असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलंय.
गणेश चतुर्थीला मालकाला भेटायला जाणार : सदाशिव यांनी पत्राद्वारे चोरी केल्याचं कबूल करत, 'बाप्पा मला माझा जॉब परत मिळू दे', अशी प्रार्थना केली आहे. 'देवा तुझ्या चरणी माझी हीच इच्छा आहे की, मला माझ्या जुन्या ठिकाणी पुन्हा नोकरी मिळू दे. तुझ्या स्थापनेच्या दिवशी मी माझ्या मालकाला भेटायला जाणार आहे. माझी जी चूक असेल ती मी मान्य करेन. फक्त त्यांच्याकडून मला होकार येऊ दे', असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
पत्राद्वारे केलं भावनिक आवाहन : ते पत्रात पुढे म्हणाले की, 'देवा, मला छोटी-छोटी मुलं आहेत. मला स्वतःच्या बळावर माझ्या मुलांसाठी आणि पत्नीसाठी घर बांधायचंय. मला शक्ती दे, देवा. आणखी किती दिवस मी दुसऱ्याच्या घरी राहू. मी खूप अडचणीत आहे. देवा, माझ्याकडे थोडं लक्ष दे. स्थापनेच्या दिवशी मालकाच्या तोंडून होकार निघू दे. मी तर तिथे येऊ शकत नाही, पण मी माझी भावना व्यक्त करणारी चिठ्ठी पाठवत आहे. मी आणि माझा परिवार एकदा तरी दर्शनाला नक्की येऊ. आमच्या घरी तूच विराजमान आहेस. मला ३० सप्टेंबर पर्यंत चांगली नोकरी लागू दे, ज्यामुळे मी माझ्या परिवाराचं पोट भरू शकेन आणि मुलांचं शिक्षण पूर्ण करू शकेन, असं भावनिक आवाहन सदाशिव यांनी पत्राद्वारे केलंय.
हेही वाचा :