मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला येत्या 17 जुलैपासून मुंबईत सुरुवात होणार आहे. या पावसाळी अधिवेशनात जनतेच्या आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. त्यासाठी सक्षम आणि आक्रमक प्रश्न विरोधी पक्षामार्फत मांडले जाणार आहेत. मात्र, या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस वगळता अन्य दोन्ही पक्ष निष्प्रभ झाले आहेत. त्यामुळे येत्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्षाचाच वर्चस्व राहणार अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेत्यांना विचारले असता त्यांनी मात्र आपण आक्रमक भूमिका घेणार असल्याचे म्हटले.
शेतकरी जनतेच्या प्रश्नावर सरकारला घेरणार : राज्यातील सर्वसामान्य जनता महागाईने होरपळून निघत आहे. विदर्भातील शेतकरी पावसाअभावी चिंतेत आहे. शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. विकास कामांना निधी दिला जात नाही. या सर्व बाबींवर येत्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्षाला विधिमंडळात घेण्याची तयारी आम्ही केली आहे. त्यादृष्टीने आमचा प्रयत्न राहील अशी प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
राजकारणापेक्षा जनतेचे प्रश्न महत्त्वाचे : पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर बोलताना विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आमचे संख्याबळ कमी झाले असले तरी राज्यात सुरू असलेल्या राजकारणापेक्षा आम्हाला जनतेचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्या दृष्टीने आमची महाविकास आघाडीची बैठक झाली असून या बैठकीत जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधिमंडळात सातत्याने आवाज उठवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. विरोधी पक्ष म्हणून आमची संख्या किती आहे? यापेक्षा आम्ही किती आक्रमकपणे जनतेच्या प्रश्नावर सरकारला घेण्यात यशस्वी होतो हाच आमचा प्रयत्न राहणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
हेही वाचा - Mahayuti Vs NCP : महायुतीचा एकत्रित शरद पवारांविरोधात महाराष्ट्र दौरा