हैदराबाद - लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर येत्या 16 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत करणार प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. मुंबईतील राष्ट्रवादी भवनामध्ये हा पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार आहे. सुरेखा पुणेकर राजकारणात येणार अशा चर्चा काही दिवसांपासून होत्या. याबाबत त्यांनी गेल्या आठवड्यातच ईटीव्ही भारतसोबत बोलताना त्यांना राजकारणात यायचं आहे की नाही, याबाबत भाष्य केलं होतं.
'ईटीव्ही भारत'सोबत काय म्हणाल्या लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर?
गेल्या आठवड्यात ईटीव्ही भारतसोबत बोलताना सुरेखा पुणेकर म्हणाल्या होत्या की, त्यांना कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारीबाबत आरक्षण दिलेले नाही. मात्र, मला नांदेडमधील देगलूर मतसंघासाठी जी पोटनिवडणूक होणार आहे, त्यासाठी तेथील लोकांनी मी निवडणूक लढवावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
दरम्यान, मी, शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे, काही लोकांसोबत तिथे जाऊनही आलो. मतदारसंघाला भेट दिली. यानंतर माझी इच्छा आहे. तिकीट मिळाले तरी नक्कीच मी निवडणूक लढवणार, असेही त्यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना सांगितले. तसेच शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी मला कोणतेही आश्वासन दिलेले नाही. तर त्यांनी मला भाजपसोबत बोलायला सांगितले होते. मी अजूनपर्यंत त्यांच्याशी काही बोलले नाही. मात्र, लवकरच त्या भाजपसोबत बोलणार असे त्यांनी सांगितले होते.
हेही वाचा - ठरलं...! लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर अजित पवारांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादीत प्रवेश
दरम्यान, ईटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीनंतर लगेचच त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत येत्या 16 सप्टेंबरला हा पक्षप्रवेशाचा सोहळा होणार आहे.
नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे काही महिन्यांपूर्वी दुर्दैवी निधन झाले. त्यामुळे देगलूर बिलोली मतदारसंघाची ती जागा आता रिक्त झाली आहे. रिक्त जागेवर निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुकांनी गर्दी केली. आता त्या विधानसभेसाठी येणाऱ्या काही दिवसात पोटनिवडणूक देखील होणार आहेत. सुरेखा पुणेकरांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिकीट देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.