मुंबई - राज्यातील पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करणे, या कामात लोकांचा सहभाग वाढविणे, निसर्गाशी संबंधीत पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांचे संरक्षण करणे या अनुषंगाने ‘माझी वसुंधरा’ अभियानाचा राज्याचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी शुभारंभ करण्यात आला. या अभियाना अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरे, गावांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून मंत्री ठाकरे यांनी मंत्रालयातून या अभियानाचा ई-शुभारंभ केला. ३१ मार्चपर्यंत अभियानाचा कालावधी असेल.
याअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ३९५ शहरे आणि ३३९ मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. उत्कृष्ट काम करणारी ३ अमृत शहरे, ३ महापालिका, ३ नगरपंचायती आणि ३ ग्रामपंचायतींना ५ जून या जागतिक पर्यावरण दिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल, अशी घोषणा यावेळी मंत्री ठाकरे यांनी केली.
तसेच या अभियानात राज्यात उत्कृष्ट काम करणारे विभागीय आयुक्त, ३ जिल्हाधिकारी आणि ३ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.
मंत्री आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले की, आपल्याला पुढच्या पिढीला चांगली पृथ्वी द्यायची असेल तर निसर्गाशी संबंधीत पंचतत्वांबरोबर आपण कसे जगू याचा विचार करावा लागेल. वातावरणाचा पॅटर्न बदलत आहे. पुर्वी निश्चित वेळी येणारा पाऊस आता अवेळी येत आहे. २०१२ पासून आपण दुष्काळाचा सामना केला, पण मागील २-३ वर्षापासून अतिवृष्टीचा सामना करत आहोत. निसर्ग वादळ, ढगफुटीसारखी संकटे वाढली आहेत. किंबहुना कोरोनासारखी संकटे हेसुद्धा वातावरणातील बदलाचाच परिणाम असल्याचे दिसते. हे रोखण्यासाठी पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्याला पर्याय नाही. इलेक्ट्रिक बसेस, इलेक्ट्रिक रिक्षांचा वापर, अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा वापर, कार्यालयांमध्ये उर्जा, पाणी यांच्या वापराचे लेखापरिक्षण करणे, कार्बन फुटप्रींटस् कमी करणे अशा अनेक उपाययोजना आपल्याला कराव्या लागतील. माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाच्या या चळवळीला गती देण्यात यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अभियानात पर्यावरणाशी संबंधित विविध घटकांचा समावेश -
या अभियानात निसर्गाशी संबंधीत पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांच्या संरक्षणाच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत केली जाणारी कामगिरी आणि राबविले जाणारे विविध उपक्रम यांच्या आधारे गुणांकन केले जाणार आहे. पृथ्वीच्या संरक्षणासाठी केले जाणारे वृक्षारोपण, नव्याने तयार होणारी हरीत क्षेत्रे, घनकचऱ्याचे वर्गीकरण, त्याचे व्यवस्थापन, किचन वेस्टचे व्यवस्थापन, हागणदारीमुक्त गाव, हागणदारीमुक्त शहराचा दर्जा, प्लॅस्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन आदी मुद्द्यांचा यात समावेश आहे.
त्याचप्रमाणे हवेची गुणवत्ता राखण्यासाठी प्रयत्न, रस्ते हरीत करणे, ग्रामीण भागासाठी उज्वला योजनेचे कव्हरेज, नॉन मोटराईज्ड किंवा सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन या मुद्द्यांचा वायू या घटकांतर्गत समावेश आहे. जलसंवर्धन, पावसाच्या पाण्याचे संवर्धन, पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे, पाण्याचे स्त्रोत आणि नद्या यांची स्वच्छता आणि पुनुरुज्जीवन करणे, त्यांचे सौंदर्यीकरण करणे, सांडपाण्यावर प्रक्रिया आदी बाबींचा जल या मुद्द्यामद्ये समावेश आहे. अग्नी या मुद्द्यामध्ये अपारंपारिक उर्जा स्त्रोतांच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यामध्ये अपारंपारिक उर्जा स्त्रोतांच्या वापरास प्रोत्साहन, सोलर तथा एलईडी लाईट्सचा वापर, बायोगॅस प्लँट्सचा वापर, ग्रामीण भागात सोलर पंपांचा वापर, शहरी भागामधील हरीत इमारतींची संख्या, शहरी भागात इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन आदी मुद्द्यांच्या आधारे गुणांकन केले जाणार आहे. आकाश या मुद्द्याअंतर्गत लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जाणीवजागृती निर्माण करणे, त्यासाठी पर्यावरणविषयक कायदे, नियमांचे जतन करण्याबाबत शपथ घेणे आदी मुद्द्यांचा समावेश आहे. एकुण १५०० गुणांच्या आधारे गुणांकन केले जाणार आहे.
दरम्यान, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर हे कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते. प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी ऑनलाईन सहभागी झाले होते.