मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचे भारतात सर्वाधिक रुग्ण मुंबई आणि महाराष्ट्रात आढळून आले आहेत. मुंबई पालिकेच्या आकडेवारीप्रमाणे 330 कोरोनाचे रुग्ण असून त्यापैकी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व मुंबईच्या महापौर प्रतिनिधित्व करत असलेल्या वरळीच्या जी साऊथ विभागात सर्वाधिक म्हणजेच 58 रुग्ण आहेत, तर सर्वाधिक कमी रुग्ण डोंगरी पायधुनीच्या बी विभागात फक्त 2 रुग्ण आहेत. मुंबई महापालिकेने आपल्या 24 विभागानुसार आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामधून ही बाब समोर आली आहे.
दरम्यान, मुंबईमध्ये असेच जर रुग्ण वाढत राहिले तर लॉकडाऊन आणखी काही दिवस वाढेल, अशी शक्यता महापौर किशोरी पेडणेकर यांनी वर्तवली आहे. लॉकडाऊन वाढू द्यायचे नसेल तर नागरिकांनी घरात राहावे. बाहेर फिरू नये. बाहेर फिरून आपण आपल्या कुटुंबाचा, नातेवाईकांचा आणि शेजारच्यांचा जीव धोक्यात घालत आहोत याचा विचार करावा, असे आवाहन महापौरांनी मुंबईकरांना केले आहे.
मुंबईत कुठे किती रूग्ण?
मुंबईत वरळी, करी रोड, परेल आदी विभाग येत असलेल्या जी साऊथ विभागात सर्वाधिक म्हणजे 58 रुग्ण आढळून आले आहेत. गिरगाव, नाना चौक बाबूलनाथच्या डी विभागात 31 रुग्ण आहेत. अंधेरी पश्चिमच्या के वेस्ट विभागात 25, अंधेरी पूर्व मरोळच्या के पूर्व 24, भायखळा माझगावच्या ई विभाग येथे 19, दहीसर पी नॉर्थ येथे 18, सांताक्रूझ विलेपार्ले एच ईस्ट येथे 18, चेंबूर नाका घाटला स्टेशन एम वेस्ट येथे 17, मानखुर्द शिवाजी नगर एम ईस्ट येथे 17, घाटकोपर एन विभाग येथे 14, कांदिवली चारकोप आर साऊथ विभाग येथे 11, भांडूप एस विभाग येथे 11, मुलुंड टी विभाग येथे 10, चंदनवाडी सी विभाग येथे 7, गोरेगाव आरे मोतीलाल नगर पी साऊथ विभाग येथे 7, वांद्रे सांताक्रुझ पश्चिम एच वेस्ट विभाग येथे 7, फोर्ट कुलाबा ए 7, कुर्ला एल विभाग 6, सायन कोळीवाडा रावली कॅम्प प्रतीक्षा नगर एफ नॉर्थ विभाग येथे 5, बोरिवली पश्चिम आर नॉर्थ विभाग येथे 4, बोरिवली पूर्व आर सेंट्रल विभाग येथे 4, दादर पश्चिम माहीम धारावी जी नॉर्थ विभाग येथे 4, परेल शिवडी काळाचौकी एफ साऊथ विभाग येथे 4 तर डोंगरी पायधुनी बी विभागात 2 रुग्ण आढळून आले आहेत.