मुंबई Laptop Sales Fraud: अटक आरोपींची नावे अकीब हुसेन सय्यद (वय 34, रा. बेंगळुरू) आणि यश संदीप गोरीवले (वय 19, रा. दिवा) अशी आहेत. गुन्ह्यातील मुख्य आरोपी असलेल्या अकिब सय्यदने सोशल मीडियावर होलसेल जुने लॅपटॉप विक्री करण्याबाबत जाहिरात केलेली होती. तसेच तो विविध सोशल मीडियावरील इतर ठिकाणच्या होलसेल जुने लॅपटॉप खरेदी-विक्री करणाऱ्या लॅमिंटन रोडवरील दुकानांची जाहिरात बघून त्यांच्याशी देखील संपर्क करत होता. त्याला जेव्हा कोणी ग्राहक होलसेलमध्ये लॅपटॉप खरेदी करण्याबाबत संपर्क करत असे त्यावेळी तो लॅपटॉपबाबत चर्चा करून ग्राहकांच्या मागणीनुसार जुने लॅपटॉप खरेदी-विक्री करणाऱ्या लॅमिंग्टन रोडवरील दुकानदारांकडे ग्राहकांना पाठवित असे. त्याआधी त्यांना लॅपटॉपची माहिती देणारा व्हाट्सअप मेसेज आरोपी सय्यद करायचा. (Laptop sale fraud Mumbai)
'अशा' प्रकारे करायचा ग्राहकांची फसवणूक: ग्राहक दुकानदारापर्यंत पोहचण्याआधीच मुख्य आरोपी दुकानदारांना मोबाईलवर संपर्क करून त्याचा माणूस लॅपटॉप बघण्याकरिता येत असून लॅपटॉप काढून ठेवण्यास सांगायचा. यानंतर ग्राहकाला दुकानदारांचा पत्ता पाठवून लॅपटॉप बघून घेण्यास सांगत असे. दरम्यान दुकानदारही लॅपटॉपच्या किंमतीबाबत काहीही चर्चा न करता थेट माझ्याशी बोल असे सांगत असे. त्यावेळी सय्यदच्या बोलबच्चननुसार ग्राहक सांगितलेल्या दुकानात लॅपटॉप बघून तो पसंत करायचा. यानंतर आरोपी सय्यद कमी किमतीत व्यवहार ठरवून ती रक्कम ही गुगल पे, फोन पे स्कॅनर पाठवून ऑनलाईन स्विकारत असे. त्यानंतर दुकानदाराकडून लॅपटॉप घ्या, असे ग्राहकांना सांगत असे. मात्र, प्रत्यक्षात ही ऑनलाईन पेमेंट केलेली रक्कम १९ वर्षीय आरोपी यश याच्या बँक खात्यात जमा होत होती.
पेमेंटविषयी विचारणा केल्यावर फसवणूक उघडकीस: पेमेंट केल्यानंतर ग्राहक दुकानदाराकडे ज्यावेळी लॅपटॉप घेण्याकरिता जातो. त्यावेळी दुकानदार त्यांना पेमेंटबाबत विचारणा करायचा. तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाली हे लक्षात यायचे. अशा प्रकारे मुख्य आरोपी सय्यदने मोठ्या शिताफीने एकाच वेळी जुने लॅपटॉप विक्री करणारे दुकानदार व ग्राहक या दोघांचीही फसवणूक केली. ग्रॅन्ट रोड येथे लॅमिंटन रोड लॅपटॉपचे मोठे मार्केट असल्याने डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात अशा प्रकारे ४ गुन्हे दाखल झालेले होते. त्यामुळे सर्व व्यापारी हतबल झाले होते. पोलिसांसमोर आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. व्यापाऱ्यांचे काही नुकसान झाले नाही. मात्र, चार दुकानातून जुने लॅपटॉप खरेदी करण्याच्या नावाखाली चार ग्राहकांची ४ लाखांना फसवणूक झाली असल्याची माहिती डी बी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय घोरपडे यांनी दिली आहे.
हेही वाचा:
- Youth Killed By Tractor : जमिनीच्या वादातून ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या, मरेपर्यंत सहा वेळा अंगावरून ट्रॅक्टर चालवला
- Raid On Drug Factory: पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात ड्रग्जचा कारखाना; मिरा भाईंदर गुन्हे शाखेची कारवाई
- Mumbai crime news : वांद्रे परिसरातून बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तीस अटक