दिवाळीमधील महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा मानला जातो. या दिवशी सायंकाळी शुभमुहूर्त पाहून धनाची देवता लक्ष्मीचे पूजन केले जाते. त्यामुळे सर्व लोक सायंकाळच्या आधीच घरी पोहोचायचा प्रयत्न करतात. व्यापारी-दुकानदार लोकही संध्याकाळी आपल्या दुकानात, आणि नंतर घरात लक्ष्मीची पूजा करतात. त्यांचीही लवकरात लवकर दुकान बंद करण्याची गडबड असते. या पार्श्वभूमीवर बाजारपेठाही लवकर बंद झालेल्या दिसून आल्या.
सायंकाळी लक्ष्मीपूजा झाल्यानंतर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच फटाके उडवून आनंद साजरा करतात. यावर्षी गेले काही दिवस सुरु असलेल्या पावसामुळे फटाक्यांचे स्टॉल उभे राहण्यास अडचण निर्माण होत होती. तसेच, नागरिकांनाही घरातून बाहेर पडून फटाक्यांची किंवा इतर खरेदी करण्यास अडचण येत होती. मात्र, काल महाराष्ट्रातील काही भाग वगळता सगळीकडेच वरुणराजाने उसंत घेतली होती. त्यामुळे, ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी का नसेना, पण लोकांना चांगल्या प्रकारे खरेदी करता आली. यामध्ये स्वदेशी बनावटीचे, तसेच जास्त आवाज न होणारे फटाके घेण्याकडे लोकांचा कल दिसला.
झेंडू स्वस्त झाल्यामुळे शहरातील लोकांची दिवाळी, मात्र शेतकऱ्याचे दिवाळे..
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे इतर पिकांसह झेंडूचेही नुकसान झाले आहे. त्यामुळेच राज्यात झेंडूचे दरही खूप कमी झाल्याचे दिसून आले. शहरी भागातील लोकांना या गोष्टीचा फायदा झाला असला, तरी शेतकरी राजाचे मात्र यात भरपूर नुकसान झाले आहे. त्यामुळे, या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या दिवाळीचा आनंद हिरावून नेला आहे.
लोकशाहीच्या उत्सवानंतर आता दीपोत्सव..
लोकशाहीचा उत्सव म्हणजेच निवडणूक. महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. निवडणुकीची धामधुम सुरु होती तोपर्यंत नेते आणि कार्यकर्ते दोघांनाही बाकी कोणत्या गोष्टीकडे लक्ष देण्याची उसंत नव्हती. मात्र, आता निवडणुका संपल्या आहेत. त्यामुळे लोकशाहीच्या उत्सवानंतर आता नेते आणि कार्यकर्ते दीपोत्सव म्हणजेच दिवाळी साजरी करण्याकडे लक्ष देत आहेत.
सोशल मीडियावरही गेले बरेच दिवस केवळ राजकीय मेसेजेस, पोस्ट फिरत होत्या. आता सोशल मीडियामध्ये दिवाळीच्या शुभेच्छांचे मेसेजेस फिरताना दिसून येत आहेत.
विविध कार्यक्रमांचे आयोजन..
राज्यात ठिकठिकाणी दिवाळीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुणे, नाशिक, नांदेड, मुंबई तसेच अनेक ठिकाणी दिवाळी पहाट विशेष कार्यक्रम घेण्यात आले. तर, संध्याकाळीही होते विशेष कार्यक्रमांचे आयोजन.