मुंबई- मुसळधार पावसाने शहराला चांगलेच झोडपून काढले आहे. काल रात्री झालेल्या जोरदार पावसात मलाडच्या पिपरीपाडा येथील एका परिसरातील संरक्षक भिंत कोसळली. त्या भिंतीला लागून काही झोपडपट्या होत्या. या झोपडपट्यांवर ही भिंत कोसळल्याने मोठी जिवितहानी झाली. याच घटनेत सगरबाई माने यांची सून कोमल माने सुद्धा गतप्राण झाली आहे.
सकाळपासून सोनलचा शोध सुरू होता. त्यात बचावकार्यादरम्यान आज (मंगळवारी) दुपारी २ वाजताच्या सुमारास श्वान पथकाला पडझड झालेल्या झोपड्यांखाली कोमल आढळून आली. या घटनेत तिचा मृत्यू झाला आहे. दोन महिन्यांपूर्वीच कोमलचे लग्न झाले होते. आता कुठे तिच्या संसाराला सुरुवात झाली होती. मात्र, कोमलच्या जाण्याने तिच्या नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे.
रात्रभर मुसळधार पाऊस सुरू होता आणि अचानक पाण्याचा वेगवान प्रभाव वस्तीत शिरला. काहीच कळायच्या आत संरक्षक भिंत कोसळली. जिवाच्या आकांताने आम्ही सर्वांनी घराबाहेर वाट काढली व मिळेल तिथे धाव घेतली. या दुर्घटनेत आमचे संपूर्ण कुटुंब बचावले. मात्र, सून कोमल माने मृत पावल्याचे तिची सासू सगरबाई माने यांनी सांगितले आहे.
यापूर्वीही पालिकेच्या जलाशयाचा भाग असलेल्या टेकडीवरून पाणी येत होते, मात्र संरक्षक भिंत कोसळून इतकी मोठी दुर्घटना झाल्याची पहिलीच घटना असल्याचे सागरबाई माने म्हणाल्या.