मुंबई - मध्य रेल्वेची पहिली वातानुकूलित (एसी) लोकल येत्या महिन्याभरात प्रत्यक्षात रुळावर धावणार आहे. या लोकलची पहिली फेरी चालवण्याचा मान हा महिला मोटरमनला देण्यात येणार आहे. या एसी लोकलच्या दिवसभरात 10 ते 12 फेऱ्या होतील. लोकल नेमकी कोणत्या मार्गावर धावणार याबाबतचा निर्णय प्रवासी संघटनांशी चर्चा करून घेण्यात येईल, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.
हेही वाचा - शेतकरी, शेतमजूरसह महिलांच्या विविध प्रश्नांसाठी आझाद मैदान येथे आंदोलन
एसी लोकल चालवण्यापूर्वी प्रवाशांचे मत देखील विचारात घेतले जाणार आहे. मध्य रेल्वेची पहिली एसी लोकल सोमवारी कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली असून येत्या महिन्याभरात ही लोकल धावणार आहे. त्यामुळे रोज लोकलच्या गर्दीतून घामाघूम होत प्रवास करणाऱ्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास आता गारेगार होणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील पुलांच्या उंचीमुळे पहिली एसी लोकल 2017 मध्ये पश्चिम रेल्वेला देण्यात आली. अखेर मंगळवारी कुर्ला कारशेडमध्ये पहिली एसी लोकल उभी करण्यात आली आहे. या लोकलमध्ये काही तांत्रिक बदल करून त्याच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर ही लोकल मध्य रेल्वेच्या नेमक्या कोणत्या मार्गावर धावेल, याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे अधिकारी शलभ गोयल यांनी दिली.
सदर लोकल 'मेक इन इंडिया' धोरणातंर्गत बांधली असून त्यासाठी सुमारे 50 कोटी रुपये खर्च आला आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल लि. (भेल) ने त्यासाठी विद्युत यंत्रणा पुरवली आहे. चेन्नईतील आयसीएफ कारखान्यात ही लोकल तयार करण्यात आलेली आहे. या एसी लोकलमध्ये स्वयंचलित पद्धतीचे दरवाजे असल्याने त्याबाबत वारंवार उद्घोषणा केली जाणार आहे. लोकलमध्ये सीसीटीव्ही देखील लावण्यात येणार आहेत. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा दरवाजा लवकर बंद न झाल्यास तत्काळ मदतीसाठी मध्य रेल्वेने खास काळजी घेत आपल्या 100 कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे या एसी लोकलची प्रतीक्षा आता प्रवाशांना लागली आहे.