मुंबई- मिशन बिगीन अगेन असे म्हणत 70 दिवसांनी मुंबईतील प्रमुख बाजारपेठा सुरू झाल्या आहेत. सरकारने दिलेल्या गाईडलाईनचे पालन करत मुंबईत दुकाने ग्राहकांसाठी खुली झाली आहेत. मुंबईतील दादर परिसरातील फुलमार्केट हे अतिशय महत्त्वाचे मार्केट आहे. मुंबईच्या विविध भागातून येथे ग्राहक फुलांच्या खरेदीसाठी येतात. मात्र, सध्या दळणवळणाची साधने मर्यादित सुरू असल्याने ग्राहकांना बाजारात येता येत नाही. परिणामी ग्राहक संख्या नसल्याने येथील व्यापारी हवालदिल झाले आहेत.
मंदिरे व इतर प्रार्थनास्थळे बंद असल्याने फुलांची विक्री घटली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापाऱ्यांनी तयारी केली आहे. दुकानासमोर ग्राहकांचे फिजिकल डिस्टन्सिंग रहावे यासाठी रंगाने ठराविक अंतराची आखणी केली आहे. तसेच ग्राहकांसाठी सॅनिटायझरची सोयही याठीकाणी करण्यात आली आहे.
कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून दादरचे फुलमार्केट पूर्णपणे बंद होते. त्यामुळे फुलविक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली होती. मात्र, आता दुकाने सुरू झाली आहेत. पण दुकात ग्राहकांची गर्दी नाही. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खर्चही वाढला आहे. त्यामुळे सध्या तरी फुलविक्रेत्यांवर आर्थिक संकट कायम आहे.