मुंबई - कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे कुलभूषण जाधव यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे नागरिकांना मुंबईत आनंदोत्सव साजरा केला आहे. यासंदर्भात ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा...
आम्ही गेल्या ४ वर्षांपासून कुलभूषण यांच्या सुटकेसाठी लढा देत आहोत. सत्याचा विजय होणार हे आम्हाला माहिती होते. त्यामुळे न डगमगता आम्ही लढा दिला. आज आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे आमच्या लढ्याला यश आले आहे, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मेरिटच्या आधारे भारताच्या बाजूने निकाल सुनावला आहे. यासोबतच पाकिस्तानने जाधव यांना सुनावलेल्या फाशीचा पुनर्विचार करावा, अशी सूचनादेखील न्यायालयाने दिली. जाधव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा पुनर्विचार होईपर्यंत त्यांना दिलेली शिक्षा स्थगित करण्यात येणार आहे.
काय आहे कुलभूषण जाधव प्रकरण?
कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्कराने 3 मार्च 2016 मध्ये तथाकथित हेरगिरीच्या आरोपावरून पकडले होते. तेव्हापासून त्यांना विनाकारण डांबून ठेवण्यात आले आहे. तसेच कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय परस्पर फाशीची शिक्षा सुनावली होती. भारताने या प्रकरणी पाकिस्तानची एकतर्फी भूमिका तसेच कारवाई करण्यावरून आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर घेण्यात आलेल्या सुनावणीमध्ये भारतीय वकील हरीष साळवे यांनी आंतरारष्ट्रीय न्यायालयात खोडून काढले होते. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती आणली होती.