मुंबई - मालवाहतुकीच्या क्षेत्रात वेगळा मार्ग तयार करणारी 'रोल ऑन रोल ऑफ सेवा' (रो-रो) सेवा कोकण रेल्वे मार्गावर मागील 22 वर्षांपासून कमालीची यशस्वी ठरत आहे. कोकण रेल्वेला रो-रो सेवेतून जानेवारी 2020 ते एप्रिल 2021 या 16 महिन्यांच्या काळात एकूण 61 कोटी 13 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे कोरोना, लाॅकडाऊन आणि कडक निर्बंधाच्या काळातही कोकण रेल्वेची रो-रो सेवा सुसाट धावत आहे.
असा वाढला महसूल
मागीलवर्षी लॉकडाऊन काळात प्रवासी रेल्वे सेवा बंद आहे. रेल्वे प्रशासनाच्यावतीने जीवनावश्यक सेवा पुरविण्यासाठी मालगाडी, पार्सल गाडीची सेवा सुरू आहे. तर, कोकण रेल्वे मार्गावरून रो-रो सेवा सुरू आहे. जानेवारी ते डिसेंबर 2020 या कालावधीत कोकण रेल्वे मार्गावरून रो-रो सेवेच्या एकूण 673 फेऱ्या धावल्या. यातून सुमारे 26 हजार 858 ट्रॅकची वाहतूक करण्यात आली. यातून सुमारे 39 कोटी 79 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर, जानेवारी ते एप्रिल 2021 या कालावधीत कोकण रेल्वे मार्गावरून एकूण 269 फेऱ्या चालविण्यात आल्या आहेत. यातून सुमारे 11 हजार 92 ट्रॅकची वाहतूक करून सुमारे 21 कोटी 34 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
इंधनाची बचत
कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर महाराष्ट्रसह संपूर्ण देशात गेल्या वर्षी लॉकडाऊन होता. त्यामुळे वैद्यकीय साहित्य, वैद्यकीय उपकरणे, अन्न इत्यादीसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे. तसेच कोकण रेल्वे मार्गावर मालवाहतुकीच्या क्षेत्रात वेगवान मार्ग तयार करणारी 'रोल ऑन रोल ऑफ सेवामार्फत' 26 हजार 858 ट्रॅकची अत्यावश्यक मालाची वाहतूक केली आहे. ही वाहतूक कोकण रेल्वे मार्गावर रो-रो सेवा कोलाड ते वेर्णा, कोलाड ते सुरतकल, वेर्णा ते सुरतकल, अंकोला ते सुरतकल या मार्गावर सुरू आहे. वातावरणातील प्रदूषण रोखले जावे, इंधनाची बचत व्हावी आणि माल वाहतुकीचा प्रवास जलद आणि सुखकर होण्याच्या दृष्टीने कोकण रेल्वेची रो-रो सेवा सुरू आहे.
हेही वाचा - तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलची दरवाढ; परभणी, इंदूरसह विविध शहरांमध्ये शतकपार