मुंबई - कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या डिसेंबर महिन्यात रेल्वेचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण होणार आहे. सध्या कोकण मार्गावरील 740 किमीपैकी 370 किमीपर्यंतचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित भागात सुमारे 85 ते 90 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि भारतीय रेल्वेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीत शर्मा यांनी दिली आहे.
इलेक्ट्रिक प्रवासी गाड्या धावणार
शंभर टक्के रेल्वे मार्ग विद्युतीकरण करून प्रदूषणाला आळा घालण्यासाठी भारतीय रेल्वेत प्रयत्न करत आहे. रेल्वे मार्गावरील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. 740 किलोमीटरच्या कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. कोकण मार्गावरील विद्युतीकरणाचे काम दोन टप्प्यात सुरू आहे. पहिला टप्पा रोह्यापासून ते दक्षिणेकडे आणि दुसऱ्या टप्प्यात गोव्यातील करमळीपर्यंत विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. सध्या कोकण रेल्वे मार्गावरील 740 किमीपैंकी 370 किमीपर्यंतचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित भागात सुमारे 85 ते 90 टक्के काम पूर्ण झाले आहेत. त्याचबरोबर सध्या मालगाड्या चालविण्यास सुरूवात केली आहे. तर, वर्षाअखेरीसपर्यंत प्रवासी इलेक्ट्रिक प्रवासी गाड्या चालविण्यास सुरूवात केली जाईल, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि भारतीय रेल्वेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीत शर्मा यांनी दिली आहे.
1 हजार 100 कोटी रुपयांची तरतूद
कोकण रेल्वेचे विद्युतीकरण करण्यासाठी सुमारे 1 हजार 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. कोकण रेल्वे मार्गादरम्यान एकूण 67 स्थानके, 179 मोठे पूल, 1 हजार 701 छोटे पूल, 91 बोगदे आहेत. कोकण रेल्वे मार्गात सर्वात मोठा बोगदा रत्नागिरी जवळील करबुडे बोगदा आहे. या बोगद्याची लांबी एकूण 6.5 किमी आहे. तर, सर्वात मोठा पुल कर्नाटकमधील शरावती नदीवर असून या पूलाची लांबी 2.065 किलोमिटर आहे. तर, सर्वात उंच पूल रत्नागिरीमधील पनवल नदीवर असून याची उंची 64 मीटर आहे. त्यामुळे मान्सून काळात बऱ्याच अडचणीवर मात करून, विशेष व्यवस्था करून विद्युतीकरणाचे काम करण्याचे काम करण्यात येत आहे, अशी माहिती सुनीत शर्मा यांनी दिली आहे.
हेही वाचा - मुंबईत 961 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 27 रुग्णांचा मृत्यू