मुंबई - आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ(मुख्य कार्यकारी अधिकारी) चंदा कोचर यांनी व्हिडिओकॉन ग्रुपला नियम धाब्यावर बसवून कर्ज दिल्याचा आरोप आहे. या कर्जा संदर्भात ईडीकडून चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील सर्व पुरावे विशेष न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. चंदा कोचर आणि दीपक कोचरसह 11 जणांच्या विरोधात विशेष न्यायालयात खटला चालवण्यासाठी पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश अभिजित नांदगावकर यांच्याकडून संमती मिळाली आहे.
काय आहे प्रकरण?
2009 ते 2011 या कालावधीत व्हिडिओकॉनचे चेअरमन वेणूगोपाल धूत व पती दीपक कोचर यांना 1 हजार 875 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. हे कर्ज नियम धाब्यावर बसवून दिल्याचा आरोप चंदा कोचर यांच्यावर करण्यात आलेला आहे. दीपक कोचर हे चंदा कोचर यांचे पती आहेत. यासंदर्भात सीबीआयकडून गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. ईडीकडूनही तपास केला जात आहे. चंदा कोचर यांच्या विरोधात आयसीआयसीआय बँकेकडून निवृत्त न्यायाधीश बी. एन. श्रीकृष्णा समिती चौकशीसाठी नेमण्यात आली होती. समितीच्या अहवालानंतर चंदा कोचर यांच्यावर फेब्रुवारी 2019मध्ये बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात नोव्हेंबर 2019मध्ये चंदा कोचर यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती जी फेटाळण्यात आली होती.
चंदा कोचर यांच्या माध्यमातून व्हिडिओकॉनला देण्यात आलेले कर्ज काही काळानंतर बुडीत कर्ज म्हणून घोषीत करण्यात आले होते. ईडीच्या म्हणण्यानुसार 9 सप्टेंबर 2009ला 300 कोटी रुपयांचे कर्ज व्हिडिओकॉन कंपनीला देण्यात आले होते. त्यानंतर व्हिडिओकॉन समूहाचे प्रमुख वेणूगोपाल धूत यांच्याकडून 64 कोटी रुपयांची रक्कम ही 'न्यू पावर रीनेवेबल्स प्रायव्हेट लिमिटेड'ला वळवण्यात आले होते. न्यू पावर रीनेवेबल्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या मालकीची असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.
चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या अगोदर दीपक कोचर यांच्याकडून दाखल करण्यात आलेली जामीन याचिका न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे.