मुंबई : मुंबई म्हटले की इथे येणाऱ्या पर्यटकांना गेटवे ऑफ इंडिया, हॉटेल ताज, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन इतकच डोळ्यासमोर येते. मात्र, या मुंबईत अशी अनेक मंदिर आहेत जी त्यांच्या स्थापत्यशास्त्रासाठी ओळखली जातात. असच एक मंदिर म्हणजे मुंबईच्या जुहू येथील मुक्तेश्वर मंदिर.
स्थापत्य शास्त्रासाठी ओळख : मुक्तेश्वर मंदिराची विशेष ओळख हे त्याच्या स्थापत्यशास्त्रासाठी आहे. जुहू येथील इस्कॉन मंदिराच्या समोरच तुम्हाला एक सात मजली मंदिर दिसते ते हेच मुक्तेश्वर मंदिर. हे मंदिर अनेक हिंदू देवी देवतांना समर्पित असून या मंदिरातील वातावरण अतिशय प्रसन्न व अल्हाददायक आहे. इथे विविध प्रकारचे धार्मिक विधी सुरू असतात. त्यामुळे या भागात येणाऱ्या पर्यटकांची पावले आपसूकच या मंदिराच्या दिशेने वळतात.
एकाच छताखाली 500 देवता : स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे मंदिर तब्बल 400 वर्षे जुने असून गगनगिरी महाराज, पुष्पकांत अनंत म्हात्रे यांनी हे अद्वितीय मंदिर बांधले. जुहूचे मुक्तेश्वर मंदिर म्हणजे देशातील एक अनोखे मंदिर असून, या सात मजली मंदिरात तुम्हाला एकाच छताखाली आपल्या हिंदू धर्मातील विविध देवी देवतांचे दर्शन एकाच ठिकाणी घेता येते. यात मूळ मंदिरा सोबतच नऊ ग्रहमध्ये एकूण एकशे पाच मूर्ती आहेत. त्यासोबतच या मंदिराच्या सातव्या मजल्यावर तुम्हाला जायचे असल्यास लिफ्ट उपलब्ध आहे. या मंदिरात श्री देव मुक्तेश्वराची प्राचीन मूर्ती आहे.
जुहूत ब्राम्हण समाजाची वस्ती : या मंदिराबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पेशवाईनंतर हे मंदिर काही ब्राह्मणांनी बांधल्याचे सांगितले जाते. तेव्हा जुहूमध्ये ब्राह्मणांची मोठी वस्ती होती, असे देखील बोलले जाते. नंतरच्या पिढीने त्यांच्या सोयीसाठी गिरगाव, दादर भागात स्थलांतर केल्याचे बोलले जाते. या मंदिरात श्री देव मुक्तेश्वराची पिंडी, गणपती, विष्णू, देवी पार्वती यांच्या दगडी मुर्त्या आहेत. मंदिरात हनुमान आणि सप्तपुरुषांची समाधी देखील आहे. वडवळ, चौकळशी पाचकळशी यांची मालमत्ताही त्यांनी गुजर समाजातील काही लोकांना विकली. त्यापैकी बहुतांश ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून मुंबईत आले होते. त्यामुळे, तुम्ही देखील मुंबईत पर्यटनासाठी येण्याचा प्लॅनिंग करत असाल तर एकदा जुहू येथील या मुक्तेश्वर मंदिराला नक्की भेट द्या. तुमचा संपूर्ण दिवस नक्कीच प्रसन्न जाईल.
हेही वाचा : Harishchandra Temple: बीडमध्ये राजा हरिश्चंद्राचे अनोख मंदिर, जाणून घ्या मंदिरामागे आख्यायिका