मुंबई- कोरोना काळात नागरिकांसाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कामगिरीबद्दल इंडिया बिझनेस ग्रुप चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे संस्थापक अध्यक्ष विकास मित्रसेन यांनी पेडणेकर यांचा "कोविड योद्धा " म्हणून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला.
इंडिया बिझनेस ग्रुप चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक अध्यक्ष विकास मित्रसेन महापौरांशी संवाद साधताना म्हणाले की, मुंबईमध्ये कोरोनाचे संकट थांबवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आघाडीवर आहे. तर यात महापौर म्हणून आपण पुढाकार घेऊन कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी राबवण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट कार्य केले आहे. याबद्दल आमच्या संस्थेच्या वतीने आपला गौरव करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. यापुढेही आपल्या हातून असेच रुग्णसेवेचे चांगले कार्य घडो ! अशी सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
महापौर किशोरी किशोर पेडणेकर सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या की, आपल्या संस्थेच्या वतीने माझा जो सन्मान करण्यात आला आहे तो संपूर्ण मुंबईकरांचा सन्मान असून मुंबईकर नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळेच बृहन्मुंबई महानगरपालिकेला कोरोनाची संख्या नियंत्रण ठेवण्यात यश मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सत्कार केल्याबद्दल महापौरांनी संस्थेचे आभार मानले आहेत.