मुंबई - भाजप पुन्हा एकदा ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांना उमेदवारी देऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. यामुळेच सोमय्यांनी भांडुपच्या भाजपच्या जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
सोमय्या म्हणाले, देशात मोदींची सत्ता आहे. चिंता करण्याची काहीच गरज नाही. आपल्या बरोबर मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे आहेत. तसेच मंत्री प्रकाश मेहता यांनी मला सांगितले आहे की, किरीट भाई तुम्ही कामाला लागा. या मेळाव्यात शेलारांना सोमय्या यांनी वचन दिले, की ईशान्य मुंबई मतदारसंघात देशातील टॉप टेन आणि सर्वात जास्त मतदान घेऊन मी निवडून येणार आहे. यासर्व गोष्टींमुळे ईशान्य मुंबईची लोकसभा उमेदवारी पुन्हा सोमय्यांना मिळण्याचे जवळ पास निश्चित झाले आहे, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे.
भाजपच्यावतीने भांडुपच्या एल. बी. एस मार्गावरील सरदार तारा सिंग बंदिस्त सभागृहात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास आमदार राम कदम, आमदार तारा सिंग, मंत्री प्रकाश मेहता, महानगरपालिका गटनेते मनोज कोटक, नुकतेच भाजप मध्ये प्रवेश केलेले प्रवीण छेडा, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि राज्यसभा खासदार भाजपचे वरिष्ठ नेते विनय सहस्त्रबुद्धे उपस्थित होते. यावेळी सर्वांनी कार्यकर्ता पुढे आणि आपण मागे अशाच प्रकारे प्रचार राबवला पाहिजे, असे प्रकाश मेहतांनी सांगितले.