मुंबई - चिथावणीखोर भाषण करणाऱ्या वारिस पठाण यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे. आम्ही केवळ १५ कोटी आहोत, मात्र १०० कोटींच्याही वरचढ ठरू, हे लक्षात ठेवा! असे वक्तव्य एआयएमआयएम पक्षाचे नेते वारिस पठाण यांनी केले. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पठाण यांच्या या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
कर्नाटकच्या गुलबर्गामधील एका जाहीर सभेत बोलताना वारिस पठाण यांनी काही चिथावणीखोर वक्तव्ये केली. 'आम्ही 15 कोटी आहोत मात्र, 100 कोटींवर भारी आहोत, इट का जबाब पत्थर से देना हम सिख गए हैं, स्वातंत्र्य मागितल्यानं मिळत नाही तर ते हिसकावून घ्यावं लागतं' असे पठाण म्हणाले. वारिस पठाण यांनी हिंदु-मुस्लीम वादात अंतिम आग लावण्याचा प्रयत्न केला आहे. पठाण यांची भाषा मोहम्मद अली जिन्ना यांच्या सारखी आहे. महाविकासआघाडीतील पक्ष त्यांना पाठिशी घालण्याचे काम करत आहे, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली.
हेही वाचा - आम्ही १५ कोटी आहोत, मात्र १०० कोटींना वरचढ ठरू... हे लक्षात ठेवा!'
आझाद मैदान, गेट ऑफ इंडिया या सारख्या ठिकाणांवर देश विरोधी घोषणा दिल्या जातात. त्यांच्यावर कारवाई का होत नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या पक्षांमध्येच अधिक हिरवा कोण यासाठी स्पर्धा आहे, असे मत सोमय्या यांनी व्यक्त केले.