मुंबई - ठाकरे सरकार घोटाळेबाज आहे. तेच आमदार प्रताप सरनाईकांचे संरक्षण करत आहेत, असा आरोप भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमैया यांनी केला आहे. प्रताप सरनाईक यांनी कोट्यवधी रुपयांची लाच घेतल्याचेही सोमैया म्हणाले आहेत.
'टॉप्स' ग्रुपकडून एमएमआरडीएला 175 कोटी रुपयांच्या कंत्राटासाठी 7 कोटी रुपयांची लाच दिल्याची माहिती समोर येत आहे. ईडीच्या चौकशीतून काही धक्कादायक बाबी उघडकीला येत आहेत. याप्रकरणी 28 ऑक्टोबर 2020 रोजी खासगी एफआयआर नोंदवला गेला होता. परंतु एमएमआरडीए, मुंबई पोलीस आणि ठाकरे सरकार यांनी अद्यापही चौकशी सुरू केलेली नाही, असा आरोप सोमैया यांनी केला आहे.
'टॉप सिक्युरिटी' एजन्सीमध्ये महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या अमित चंदोले यांना १७५ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) ईडीने ही कारवाई केली. चंदोले, प्रताप सरनाईक, टॉप्स ग्रुपची सुरक्षा सेवा पुरवणारे आणि त्यांचे प्रवर्तक राहुल नंदा यांच्यात झालेल्या संशयास्पद व्यवहारांची चौकशी ईडी करत आहे.
१२ तासांच्या चौकशी नंतर अटक
याप्रकरणी गुरुवारी अमित यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तब्बल १२ तास चौकशी केल्यानंतर अखेर ईडीने त्यांना अटक केली. टॉप सिक्युरिटी कंपनीकडून एमएमआरडीएला सुरक्षा रक्षक पुरवण्याचे काम केले जात होते.
काय आहे प्रकरण?
एमएमआरडीएने मुंबई आर्थिक गुन्हे शाखेत केलेल्या तक्रारीनुसार, टॉप्स सिक्युरिटीचे मुख्य भागीदार अमित चंदोले यांनी एमएमआरडीए करता सुरक्षा रक्षक पुरवण्याचे मोठे कंत्राट घेतले होते. त्या कंत्राटाकरता अमित चंदोले आणि कंपनीने १७५ कोटी रुपये घेतले होते. मात्र कोणतीही सुविधा न देता हे पैसे अमित चंदोले यांनी लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एमएमआरडीएने एफआयआर किंवा तक्रार का दिली नाही?
28 ऑक्टोबरला या प्रकरणाबाबत एक खासगी एफआयआर नोंदवण्यात आला, तरी आतापर्यंत चौकशी झाली नाही. ठाकरे सरकार शिवसेनेचे नेते आमदार प्रताप सरनाईक यांचे संरक्षण करत आहे, हे यावरून स्पष्ट होत असल्याचे सोमैया म्हणाले.