मुंबई - शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याचबरोबर रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होण्याचा प्रकार वाढत आहे. आज केईएम रुग्णालयातील एका ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. ही महिला केईएम रुग्णालयात आया म्हणून काम करत होती.
कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना मुंबईमधील साई, जसलोक, वोकहार्ड आदी रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तेव्हा पालिका रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय, आया यांनी सेफ्टी किटच्या मागणीसाठी भाभा रुग्णालयात आंदोलन केले होते. यातच आज परळ येथील केईएम रुग्णालयात आया म्हणून काम करणाऱ्या ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.
कोरोनाबाधीत आया ही धारावीत राहते. तिला काही दिवसांपासून त्रास होत होता. काल तिचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यात ती पॉझिटिव्ह आढळली. यामुळे तिच्यावर सेव्हन हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, तिच्या संपर्कात आलेल्या, तिचा मुलगा आणि १६ कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली असून अहवाल प्राप्त होईपर्यंत, त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.
हेही वाचा - 'चेंबूरच्या पी. एल. लोखंडे मार्गावर वरळी, धारावीसारखी यंत्रणा राबवली तरच हा भाग वाचेल'
हेही वाचा - चित्रपट निर्माते करीम मोराणी कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णालयात दाखल