मुंबई : कार्तिकी वारीचं महत्त्व सांगताना ह.भ.प शामसुंदर सोन्नर सांगतात की, "पांडुरंग परमात्मा स्वतः सांगतात की बाबा तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही कष्टकरी आहात. आज वारकरी सगळे कष्ट करीत आहे. त्यांनी प्रत्येक वारी करावी अशी अपेक्षा आहे. पण प्रत्येक वारीला सर्वांना त्यांच्या जबाबदाऱ्यांमुळं येता येईल अशी शक्यता नाही. पण पांडुरंग सांगतात 'किमान आषाढी कार्तिकीला विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग'.. हे गुज स्वतः पांडुरंग सांगतात. हा असा देव आहे की कधी कुणाला काही देत नाही आणि कोणाकडून काही घेत नाही याच्याकडे केवळ प्रेमाचा व्यवहार आहे. प्रेम सुख देई, प्रेम देई समाधान. जिथे प्रेमाचं नातं असतं तिथं अपेक्षा नसते आणि जिथे अपेक्षा नसते तिथे अपेक्षाभंग नसतो. म्हणून पांडुरंगाचे भक्त आपल्याला सदैव आनंदी असलेले दिसतात, असे ह.भ.प. शामसुंदर सुंदर सोन्रर यांनी सांगितलं.
काय आहे परंपरा? कार्तिकी एकादशी ही देवशयनी एकादशी मानली जाते. म्हणजे देवालाही काम केल्यानंतर थकवा येतो आणि देव विश्रांती घेतो, देव झोपतो असा समज आहे. ज्याप्रमाणे माणसे रात्री झोपल्यानंतर आपण सकाळी ताजेतवानं होवून उठतो. माणसाची शक्ती कमी आहे, माणसाला काम कमी आहे म्हणून आपण एका रात्रीत पुन्हा फ्रेश होतो. मात्र देवाला प्रचंड व्याप आहे त्यामुळं तो आठ महिने सतत काम करतो आणि आषाढी एकादशीला तो विश्रांती घ्यायला जातो. देव पुढे चार महिने विश्रांती घेतो याला चातुर्मास म्हणतात. या चातुर्मासाच्या कालावधीत भक्तजन नेहमी त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात. सगळे भक्त देवाला उठवण्याचा प्रयत्न करीत असतात उठा उठा देवा आता वेळ झाली. अरुणोदय झाला प्रभात झाली निद्रेची वेळ सरली, अशी काकड आरती दररोज केली जाते. हा चार महिन्यांचा काळ कार्तिकीला संपतो आणि देव पुन्हा एकदा ताजे तवाने होऊन भक्तांसाठी कामाला लागतो असं म्हटलं जातं.
कार्तिकीला किती भाविक येतात? आषाढी एकादशीला राज्यभरातून सुमारे नऊ ते दहा लाख वारकरी येत असतात, तर कार्तिकी एकादशीला तीन ते चार लाख वारकरी येत असतात. आषाढी एकादशीचे वारकरी वेगळे आणि कार्तिकी एकादशीचे वारकरी वेगळे अशी सुद्धा परंपरा आहे. याशिवाय चैत्र वारी आणि माघ वारी सुद्धा केली जाते. माघ वारीचे वारकरी हे बहुदा कोकणातील असतात.
आषाढीला मुख्यमंत्री तर कार्तिकीला उपमुख्यमंत्री : आषाढी वारीला विठ्ठलाच्या पूजेचा मान राज्याचे मुख्यमंत्री यांना देण्यात येतो तर कार्तिकी एकादशीच्या वारीसाठी विठ्ठल पूजेचा मान हा उपमुख्यमंत्र्यांना दिला जातो. असेही सोन्नर यांनी सांगितलं.
तणाव मुक्तीसाठी वारी लाभदायक : वारी ही जरी धार्मिक किंवा परंपरागत असली तरीसुद्धा वारीच्या माध्यमातून भक्तांना मुख्य अनुभव येतो तो तणाव मुक्तीचा. वारीमुळं वारकरी किंवा भक्तगण त्यांच्या जीवनातील अडीअडचणी आणि समस्या विसरून जातात पांडुरंगाच्या चरणी तल्लीन होऊन जातात. त्यामुळं त्यांच्यावरील असलेला तणाव हा निघून जातो आणि जगण्यातला पुन्हा एकदा आनंद आणि उत्साह त्यांच्यात संचारला जातो. त्या दृष्टीनं वारी ही खूप महत्त्वाची आणि लाभदायक ठरते, अशी प्रतिक्रिया मानसशास्त्रज्ञ डॉक्टर शैलेश लोमटे यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा :