मुंबई - आधी मुंबई पोलीस आणि त्यानंतर थेट मुंबई शहराची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगना रणौतचा सूर अखेर काहीसा मवाळ झाला आहे. मुंबईबाबत तिने केलेल्या वक्तव्याबाबत टिकेची धनी झालेल्या कंगनाने 'मुंबई ही माझी कर्मभूमी असून मी तिला मैय्या यशोदेप्रमाणे मानते, मात्र माझे या शहरावर किती प्रेम आहे याचे प्रमाण मला इतरांना देण्याची गरज नाही.' असे ट्विट करून सारवासारव तिने करण्याचा प्रयत्न केला आहे.
![kangana says how much i love mumbai need not tell to other](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-01-kangana-toned-down-mhc10076_05092020024239_0509f_1599253959_149.jpg)
'माझे मित्र आणि पाठीराखे ज्यात महाराष्ट्रातील लोकांचा देखील समावेश आहे ते मला नक्की समजून घेतील. त्याना माझ्या बोलण्याचा हेतू चांगला माहीत असल्याने ते गैरसमज करून घेणार नाहीत. मुंबई शहर ही माझी कर्मभूमी असून मी तिला मय्या यशोदेप्रमाणे मानते, मात्र माझं या शहरावर किती प्रेम आहे याचे प्रमाण मला इतरांना देण्याची गरज नाही. असे तिने शुक्रवारी रात्री नवीन ट्विट केले.
मुंबईत सुरक्षित वाटत नसून पाक व्याप्त काश्मीर मध्ये आपण आलो की काय?, अशी टीका करणारे ट्वीट कंगनाने केले होते. या तिच्या वक्तव्यानंतर राज्यातल्या अनेक नेत्यांनी त्याबाबद्दल नाराजी व्यक्त करत टीका केली होती. यानतंर काल तिने दिवसभर अनेक ट्विट केली. अगदी मुंबईत येण्याची तारीख सांगातली होती अशातच, स्वतःची तुलना थेट झाशीच्या राणीशी देखील करून घेतली. मात्र तिच्या या बेताल वक्तव्याबाबत नेटिझन्स तिच्या पोस्ट ट्विटरकडे रिपोर्ट करायला लागले तेव्हा आपण कुठेतरी काहीतरी चुकीचे केल्याची उपरती कंगणाला झाली.
दुसरीकडे या वक्तव्याचा हिंदी, मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटीनी खरपूस समाचार घेतला. यात स्वरा भास्कर, रेणुका शहाणे यांच्यापासून ते आदेश बांदेकर, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव यांनी देखील याबाबत उघडपणे आपली भूमिका मांडली. याशिवाय शिवसेना, मनसे आणि राजपूत करणी सेनेने देखील कंगणाला धडा शिकवण्याचा इशारा दिल्याने अखेर तिचा सूर काहीसा मंदावला आहे, असेच म्हणावे लागेल. आता कंगना एवढ्यावरच थांबते की पुन्हा काही नवीन ट्विट टाकून नवा वाद ओढावून घेते ते पाहावे लागेल.