मुंबई - आज प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाची समाज माध्यमांवर जोरदार चर्चा आहे. अभिनेत्री कंगना राणावतने या आंदोलनावर टीका करताना, या आंदोलनाला समर्थन देणाऱ्यांना दहशतवादी म्हटले आहे.
सहा मोठ्या कंपन्यांनी माझ्याशी केलेला करार मोडला. काही करारांवर मी सही केली होती, तर काहींवर करणार होते. त्यांचे म्हणणे आहे की, मी या तथाकथित शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्यामुळे ते माझ्याशी करार करू शकत नाहीत. आज मी या दंगे भडकवणाऱ्या प्रकारांना समर्थन करणाऱ्या प्रत्येक भारतीयाला आणि अशा देशविरोधी मोठ्या कंपन्यांना दहशतवादी म्हणणे पसंत करते, असे ट्विट करून कंगनाने म्हटले आहे.
![कंगना](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/49-mh-mhc10078-kangana_26012021180203_2601f_1611664323_626.jpg)
त्या सर्वांना तरुंगात टाकले पाहिजे
कंगनाने ट्विटरवर एक व्हिडिओही शेअर केला असून तिने त्यात म्हटले आहे की, आज आपण जगासमोर विनोद बनलो आहोत. देशाची, सरकारची आणि सर्वोच्च न्यायालयाची अशा लोकांनी उघड-उघड थट्टा चालवली आहे. या देशामध्ये काहीही होऊ शकत नाही, कोणी एक पाऊल पुढे टाकत असेल तर त्याला दहा पाऊले मागे ओढले जाते. आज ज्यांनी दिल्लीत दंगे-धोपे केले त्या सर्वांना तरुंगात टाकले पाहिजे, त्यांची संपत्तीही जप्त केली पाहिजे. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील एका ठिकाणी शेतकर्यांनी आपला ध्वज फडकावल्यानंतर गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर कंगनाने ट्विट करून संतप्त मत व्यक्त केले.