मुंबई - पोलिसांनी कारवाई करत कंगना रणौतच्या बॉडीगार्डला अटक केलीय. अत्याचार आणि फसवणूकीच्या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुमार हेगडे याला कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे.
आरोपी पोलीस स्टेशनच्या बाहेरच उभा होता
मुंबई पोलिसांची टीम जेव्हा आरोपीच्या शोध घेत त्याच्या घरी पोहोचली तेव्हा आरोपी आणि त्याची आई लग्न पत्रिका वाटण्यासाठी गेले असल्याचं कळलं. पोलिसांनी लोकल पोलिसांची मदत घेत आरोपी आणि त्यांच्या आईशी संपर्क केला. त्यानंतर त्याची आई आणि आरोपी पोलीस स्टेशन येथे हजर झाले. मात्र आरोपी पोलीस स्टेशनच्या बाहेरच उभा होता. दरम्यान याच आरोपीची ओळख पटवण्यासाठी पीडितेला पोलीस सोबत घेवून गेले होते. आरोपीची ओळख होताच पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली.
काय आहे प्रकरण?
मुंबईच्या डी एन नगर पोलीस स्टेशनमध्ये कंगना रणौतच्या बॉडिगार्ड विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवून एका ब्युटीशयन महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. ब्युटीशियनने दिलेल्या जबाबानुसार आरोपीसोबत 8 वर्षांपूर्वी ओळख झाली होती मात्र आरोपीनं जून महिन्यात लग्नाचा प्रस्ताव ठेवला.
'आरोपी लग्नाच्याबाबीकडं दुर्लक्ष करू लागला'
आरोपीकडून आलेल्या लग्नाच्या प्रस्तावाचा स्वीकार महिलेकडून करण्यात आला. यानंतर ही महिला आरोपीसोबत त्याच्या प्लॅटवर राहू लागली. दोघांमधले संबंध वाढत गेले. मात्र नंतर आरोपी लग्नाच्याबाबीकडं दुर्लक्ष करू लागला. 27 एप्रिल रोजी आरोपीनं महिलेकडून 50 हजार रुपये घेतले. यासाठी त्यानं कौटुंबिक कारण देखील दिलं.
आरोपी पैसे घेवून कर्नाटककडे रवाना
आरोपी पैसे घेवून कर्नाटककडे रवाना झाला. मात्र नंतर महिलेचा फोन उचलनं त्यानं बंद केलं. महिलेनं एकदा आरोपीला फोन लावला असता आरोपीच्या आईनं फोन उचलला. आणि ब्युटिशिएनसोबतच्या लग्नाला नकार देत असल्याचं सांगितलं. तसंच मुलासाठी स्थळ शोधत असल्याचं देखील सांगण्यात आलं. त्यानंतर पीडित महिलेनं पोलीस स्टेशन गाठलं आणि आरोपीच्या विरोधात तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी कलम 376,377 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.