मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणांनी चर्चेत आहे. सोशल मीडियावर सातत्याने करण्यात येत असलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे ती गोत्यात आली आहे. कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरोधात वांद्रे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. याबाबत चौकशीसाठी वांद्रे पोलिसांनी कंगनाला तिसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्ये कंगनाने केल्यामुळे वांद्रे न्यायालयाने मुंबई पोलिसांना कंगनावर गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते.
यापूर्वी कंगनाला दोनदा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, कंगनाने वैयक्तिक कारणामुळे चौकशीसाठी 15 नोव्हेंबरपर्यंत हजर राहू शकणार नाही, असे कळवले होते. त्यानंतर पोलिसांनी तिसरी नोटीस बजावली आहे. कंगनाला 23 नोव्हेंबर 24 नंबर अशा दोन दिवशी हजर राहण्याची नोटीस दिली आहे.
काय आहे प्रकरण ?
हिंदू आणि मुस्लीम या दोन समुदायांत परस्परांविषयी द्वेष उत्पन्न होईल आणि जातीय सलोखा बिघडेल असे टि्वट कंगनाने केले होते. कंगनाच्या टि्वटमुळे सामाजिक द्वेष वाढल्याचा आरोप याचिकाकर्ते बॉलीवूडमधील कास्टिंग डायरेक्टर मुनावरअली सय्यद यांनी बांद्रा न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये केला होता.
हेही वाचा - कंगना रणौतला दुसऱ्यांदा समन्स, वांद्रे पोलीस ठाण्यात पुन्हा अनुपस्थित