मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर यासंदर्भात मुंबई पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे. मात्र, रेणू शर्मा या महिलेच्या विरोधात भाजपचे नेते कृष्णा हेगडे व मनसेचे नेते अमित धुरी यांनीही ब्लॅकमेलिंगचा आरोप लावल्यानंतर यासंदर्भात आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना ऊत आलेला आहे. दरम्यान, मुंबई पोलीस खात्याचे कायदा व सुव्यवस्था सह आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यानंतर विश्वास नागरे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतल्याचे समोर येत आहे.
मुंडेंवरील आरोप गंभीर - शरद पवार
दरम्यान, खासदार शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावर बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर लावण्यात आलेले आरोप हे गंभीर असून यासंदर्भात पक्षातील इतर ज्येष्ठ नेत्यांशी आपण चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे म्हटले आहे. मात्र , राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी गुरुवारी (दि. 14 जाने.) प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना म्हणाले, आतापर्यंत झालेल्या बैठकीत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा झालेली नसून पोलिसांच्या निष्कर्षानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. शरद पवारांच्या भेटीला मुंबई पोलीस खात्याचे सह आयुक्त आल्यामुळे सध्या या विषयाला घेऊन वेगळी चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा - एक चूक आणि सर्वांचा जीव टांगणीला..!