मुंबई- दिल्लीतील भाजपच्या कार्यालयात शनिवारी भाजप नेते जयभगवान गोयल यांच्या 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करण्यात आली. या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. राज्यात ठिकठीकाणी आंदोलन आणि निषेध करण्यात येत आहे.
नाशिक- येथे शिवसेनेच्या वतीने भाजप नेत्यांच्या प्रतिकात्मक पोस्टरची होळी करत आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखाची सर सुद्धा मोदी यांना नसून छत्रपती शिवाजी महाराजांसारखी व्यक्ती पुन्हा होणे नाही, असे म्हणत शिवसेनेच्या वतीने या पुस्तकाचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजप नेत्यांच्या प्रतिकात्मक फोटोला शाई लावून पोस्टरची होळी करण्यात आली.
हिंगोली- जिल्ह्यातील सेनगाव येथे युवा सेनेकडून गोयल यांच्या प्रतिकात्मक फोटोचे दहन करत आंदोलन करण्यात आले. यावेळी पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी तहसीलदार कांबळे यांना निवेदन देवून करण्यात आली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख, तालुका प्रमुख संतोष देवकर, व्यापारी आघाडी तालुकाप्रमुख शैलेश तोष्णीवाल, पिंटू गुजर, शहरप्रमुख जगन्नाथ देशमुख, गजानन महाजन, उपनगराध्यक्ष प्रवीण महाजन, युवासेना उपजिल्हाप्रमुख अनिल अगस्ती आदींची उपस्थिती होती.
पुणे- छत्रपती शिवाजी महाराजांना नरेंद्र माेदींच्या बराेबर आणण्याचा प्रयत्न केला जाताे आहे. त्याचा आम्ही निषेध करताे. माेदींची किंचितही महाराजांशी बराेबरी हाेऊ शकत नाही. हे पुस्तक म्हणजे शिवभक्तांचा अपमान आहे. भाजपने याबाबत माफी मागावी, अशी मागणी खासदार वंदना चव्हाण यांनी केली. आज पुण्यातील लाल महालासमाेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून या पुस्तकाचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजपच्या विराेधात जाेरदार घाेषणाबाजी करण्यात आली. तसेच हे पुस्तक मागे घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी खासदार वंदना चव्हाण, शहराध्यक्ष तथा आमदार चेतन तुपे आदी उपस्थित हाेते.