मुंबई : Jayant Patil On Ramesh Kadam : मंत्री छगन भुजबळ कारागृहात असताना शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश कदम यांनी केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील राजकारण चांगलचं तापलं आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रमेश कदम कशाच्या आधारे आरोप करतात, माहित नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे याप्रकरणी आता राजकारण रंगत असून आरोपप्रत्यारोप होत आहेत.
तुरुंगात दोघांची चर्चा झाली असेल : रमेश कदम कशाच्या आधारे बोलतात, मला माहित नसल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. तुरुंगात असतांना त्या काळात दोघांची चर्चा झाली असेल, तर ती मला माहीत नाही. चुकीच्या पद्धतीचा शरद पवार दबाव स्वीकारतात असं, मला वाटत नसल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. काही आवश्यक असेल तर त्या गोष्टी ते करतात. छगन भुजबळ आमेच सर्वांचे सहकारी होते. ते तुरुंगातून बाहेर यावे, यासाठी सतत त्यांचं कुटुंब आणि आम्हा सर्वांचे प्रयत्न कायम होते. छगन भुजबळ तुरुंगात असताना देखील खासदार सुप्रिया सुळे या त्यांची भेट घेत होत्या. त्यांची लवकरात लवकर तुरुंगातून सुटका व्हावी, हा सगळ्यांचा उद्देश होता, असंही जयंत पाटील यांनी यावेली सांगितलं.
पाणीटंचाई दूर करावी, बाप्पाकडं साकडं : परतीच्या पावसानं पाणीटंचाई दूर करावी, असं बाप्पाकडं साकड घातल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी बाप्पाकडं सर्वांनी प्रार्थना केली होती. देशातील दुष्काळाचं सावट काही अंशी कमी व्हावं. गेल्या दहा दिवसात राज्यातील पुणे, मुंबई आणि राज्यातील ग्रामीण भागात थोड्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरणात पाण्याचा साठा सुधारला आहे. जुलैपर्यंत आपल्याला पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे. ऑक्टोबर महिन्यातील परतीच्या पावसानं पाणीटंचाईचं संकट दूर करावं, महागाईचं संकट दूर करून देश प्रगतीपथावर न्यावा, तसेच महाराष्ट्र राज्याला अधिक सुबद्धता यावी, अशी मागणी गणपती बाप्पाकडं केली असल्याचं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
पक्ष चोरणाऱ्या शक्तींना यश येऊ नये : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर आलेल्या संकटासंदर्भात बापाकडं आपण काही मागितलं का, या प्रश्नाला जयंत पाटील यांनी उत्तर दिलं. पक्षावर आलेलं संकट कृत्रिम आहे. या संकटाच्या काळात तो न्यायाच्या बाजुनं म्हणजेच आमच्याच बाजुनं राहून आशीर्वाद द्यावा, देशात पक्ष चोऱ्या करण्याचं प्रमाण वाढत आहे. त्या शक्तींना त्यात यश येऊ नये, यासाठी आशीर्वाद आम्ही आज बाप्पाकडं मागितल्याचं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं.
रोहित पवार समर्पक उत्तर देतील : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामतीतील अॅग्रो प्लांटला महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळानं नोटीस पाठवली आहे. त्याला ते 72 तासात योग्य प्रकारे समर्पक उत्तर देतील, असं जयतं पाटील यांनी सांगितलं. कारखाना अजून सुरु होणं बाकी आहे. फार चिंता करण्यासारखं नसेल, असं मला वाटत असल्याचंही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं.
मराठी दाम्पत्याला फ्लॅट नाकारणं गंभीर बाब : मराठी आहे म्हणून दाम्पत्याला फ्लॅट नाकारल्या जात असेल, तर ही गोष्ट अतिशय गंभीर असल्याचं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं. मराठी माणसांवर अशा प्रकारची वेळ मुंबईत निर्माण का झाली, याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. अशा प्रकारे भाषेवर, जातीवर, धर्मावर अवलंबून असणाऱ्या सोसायट्या आणि ठराविक धर्माच्या लोकांनी एकत्र राहणं थांबलं पाहिजे. सर्वधर्म समभाव कमी होता कामा नये. अशा प्रकारच्या प्रवृत्तीचा बंदोबस्त करावा लागेल. मुंबईत मराठी माणसाकडं बघण्याचा दृष्टिकोन कोणाचा वक्र असेल, त्याची गंभीर दखल आम्ही तर घेऊ असंही जयंत पाटील यांनी सांगतलं. सरकारनं देखील याच्यात पुढाकार घेतला पाहिजे असं, आवाहन जयंत पाटील यांनी सरकारला केलं आहे.
हेही वाचा :