मुंबई - राज्यातल्या गडचिरोली, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यातल्या दारूबंदीच्या जन जागृतीसाठी अर्थसंकल्पात 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, दारूबंदीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला धारेवर धरले आहे. दारू बंदी करायची असेल तर केवळ तीन जिल्ह्यातच का राज्यातल्या इतर जिल्ह्यात का नाही, असा सवाल पाटील यांनी केला आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना त्यांनी सरकारवर आगपाखड केली.
सुजलाम सुफलाम महाराष्ट्राला तुम्ही कर्जबाजारी केलं. सिंचनाची आकडेवारी तुम्ही का दडवली. किती सिंचन झालं ते दाखवायचे धाडस सरकारका दाखवत नाही? अशा प्रश्नांची सरबत्तीच पाटील यांनी केली. लोकांच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी सिंचनाच्या नावावर 12 हजार कोटींची तरतूद केली आहे. मात्र सिंचन किती वाढले याची माहिती जनतेला मिळाली पाहिजे अशी मागणी ही त्यांनी केली.
अर्थमंत्री त्यांच्या भाषणात म्हणाले, १८ हजार ६४९ गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे पूर्ण झाली आहेत. जर १८ हजार गावांत जलयुक्त शिवारची कामे पूर्ण झाली असतील, तर मग आज राज्यात १५ – २० – २५ हजार गावांमध्ये दुष्काळ का आहे ? असा सवालही जयंत पाटील यांनी केला.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. ‘ऋृण काढून सण साजरा करू नये’. मात्र निवडणुकीचा सण साजरा करण्यासाठी सरकारने ऋृण काढायचं ठरवलंय. या ग्रेट सरकारने २० हजार २९२ कोटी रुपये महसुली तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. एवढ्या मोठ्या महसुली तुटीचा अर्थसंकल्प आजपर्यंत राज्याच्या इतिहासात मांडण्यात आला नाही, असेही त्यांनी सांगितले.
राज्याचा कृषी विकासदर दोन आकडी करणार असल्याच्या बाता अर्थमंत्र्यांनी मारल्या होत्या. मात्र आज राज्याच्या कृषी विकासदर ०.८ इतका आहे. विकासदर किमान एक आकडी तरी करा, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.