मुंबई - पाऊस येण्यापूर्वी भाषण सुरू करणे आणि पाऊस आल्यावर जाऊन भाषण करणे यात फरक असतो. हे केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांना कळणार नाही, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. पावसात भाषण केल्याने यश मिळते, असे विधान रावसाहेब दानवे यांनी केले होते. त्याला पाटील यांनी प्रतिउत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेल्फेअर ट्रस्टकडून आज कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील महाविद्यालयांना संगणकाची मदत देण्यात आली. त्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पाटील बोलत होते.
निसर्ग चक्री वादळात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्थांचे नुकसान झाले. त्यांना राष्ट्रवादी ट्रस्टकडून मदत दिली जात आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील १२ कॉलेजला मदतीचा पहिला टप्पा आज पाठवण्यात आला. पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून पाठवण्यात येत असलेल्या गाडीला खासदार सुप्रिया सुळे, रायगड जिल्ह्याच्या पालक मंत्री अदिती तटकरे यांनी हिरवा झेंडा दाखवला.
या वेळी माध्यमांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी जयंत पाटील यांना प्रश्न विचारले. त्याबद्दल सर्व पोलिसांवर सोडावे. सुशांतसिंहच्या खासगी जीवनावर सतत चर्चा करणे योग्य नाही. बिहार पोलिसांना काय माहिती हवी आहे, ती राज्य पोलीस देतील. बिहारमध्ये सुशांतच्या प्रकरणावर राजकारण होईल की नाही माहीत नाही, पण राज्यातील लोकांनी राजकारण थांबवावे, असे आवाहनही त्यांनी केले.