मुंबई - राज्य सरकार नियमांची पायमल्ली करून बिल्डरांचा फायदा करत आहे. महसूलमंत्र्यांच्या सहमतीने हवेली तालुक्यातील म्हातोबा ट्रस्टची ८४ कोटी रुपयांची इनाम जमीन विकली गेली. यात ४२ कोटी रुपयांचा महसूल बुडाला असून या भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला हवी. खडसेंवर जशी कारवाई केली, तशी कारवाई महसूलमंत्र्यांवरही करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली.
जयंत पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर थेट आरोप करत केसनंद येथील म्हातोबा देवस्थान जमीन प्रकरण मांडले. यामध्ये ४२ कोटी रुपयांचा शासनाचा महसूल बुडाला आहे. सर्व कायद्याचे उल्लंघन होत आहे. ५० टक्के नजराणा न भरता ही जमीन विक्री झाली. ही सर्व जमीन २३ एकर आहे. याची किंमत २५० ते ३०० कोटींच्या घरात आहे.
गैरव्यवहाराचे असे एकच प्रकरण नसल्याचे जयंत पाटील म्हणाले. पुण्यातील बालेवाडी येथे खेळाच्या मैदानासाठी एक जागा आरक्षित होती. उमेश वाणी यांनी ही जागा हडप केली. ३६ गुंठे ऐवजी १० गुंठे जमीन जास्त दाखवली, आणि ३०० कोटींची इमारत उभी केली. उपअधिक्षक स्मीता गौड या अधिकाऱ्यांनी फसवी मोजणी केल्याचा आरोप त्यांनी केला. महसूलमंत्र्यांनी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची शंका असल्याचे ते म्हणाले.
महसूलमंत्र्यांना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार अधिकार नाही. या भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला हवी. खडसेंवर जशी कारवाई केली तशी कारवाई महसूलमंत्र्यांवर करावी. लाज बाळगून महसूलमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असे जयंत पाटील म्हणाले.