मुंबई - बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक एनसीबीच्या कारवाईवर सातत्याने टीका करत आहेत. नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी एजन्सीच्या छाप्यादरम्यान पंच (साक्षीदार) म्हणून कौटुंबिक मित्राचा कथित वापर आणि त्यानंतर ड्रग्जची वसुली, यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. याला आता समीर वानखेडे यांच्या बहीण जास्मिन वानखेडे आणि माजी सैनिक प्लेचर पटेल यांनी उत्तर दिले आहे.
जास्मिन वानखेडे काय म्हणाल्या?
अमली पदार्थ विरोधी कारवाया करणे यात गैर काय आहे. हे काही वाईट काम नाही. सेलिब्रेटिज पकडले जात आहेत. राजकारणात असलेल्यांच्या नातेवाईकांना पकडण्यात येत आहे. मग समस्या कुठे आहे? प्लेचर पटेल महाराष्ट्र सैनिक फाऊंडेशचे प्रमुख आहेत. त्यांनी सोबत काम केले आहे. माजी सैनिक असल्यामुळे त्यांनी एनसीबीसोबत काम केले असेल. मला वाटते की, आरोप करण्यांना सबळ पुरावे न मिळाल्यामुळे त्यांनी सून आणि मुलींना ट्रोल करण्याचे ठरवले. कुणाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जाऊन जुने फोटो तपासणे, पाहणे ही फार खालच्या दर्जाची गोष्ट आहे. आयुष्यात काही चांगली कामे केले असते तर बरे झाले असते, असा टोलाही त्यांनी जास्मिन यांनी लगावला.
माजी सैनिक प्लेचर पटेल काय म्हणाले?
माझ्यावरील आरोप मी समीर वानखेडेंचा फॅमिली फ्रेंड आहे म्हणून केलाय की पंच आहे म्हणून केलाय. आधी मी त्यांना फॅमिली फ्रेंड आहे किंवा नाही. मला गर्व आहे की, मी त्यांच्या परिवारातील सदस्य आहे. ते चांगले काम करत आहेत. त्यांचे वडीलही पोलीस अधिकारी होते. माझे वडील वारल्यानंतर त्यांनी मला आपल्या मुलासारखे ट्रेनिंग दिले. एका सैनिक अधिकाऱ्याला तयार केले. राहिली गोष्ट लेडी डॉन बाबत तर माझी बहीण (जास्मिन वानखेडे) कुणालाही घाबरत नाही. म्हणून मी तिला लेडी डॉन म्हणतो. या प्रकरणात पंच बनण्याबाबत मला गर्व वाटतो.
हेही वाचा - ड्रग ही समाजाला लागलेली कीड, त्यात राजकारण करणे चुकीचे - देवेंद्र फडणवीस
नवाब मलिक यांचे आरोप काय?
फ्लेचर पटेल हे समीर वानखेडेंचे फॅमिली फ्रेंड आहेत. हे फॅमिली फ्रेंड एखाद्या छापेमारीच्या प्रकरणात कसे काय पंच होऊ शकतात? असा सवाल राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी केला. २ ऑक्टोबरपर्यंत पंचांना ओळखत नाही हे समीर वानखेडे कसे सांगतात? हे तीन व्यक्ती कसे पंच झाले हे एनसीबीने सांगणे गरजेचे आहे. ही लेडी डॉन कोण आहे? फ्लेचर पटेल कुठे कुठे जात आहेत? फिल्म इंडस्ट्रीत काय दहशत निर्माण करत आहेत? इंडस्ट्रीत पैसे उकळण्याचे काम करत आहेत का? फ्लेचर पटेलसोबत दिसणारी लेडी डॉन कोण आहे? फ्लेचर पटेल इंडिपेंडेंट आहे का? तुम्ही लोकांना फसवत आहात. या दोघांच्या माध्यमातून काय कारवाया सुरू आहेत. ही फिल्म इंडस्ट्रीत काय काम करत आहे? एखादा फॅमिली फ्रेंड कसा काय पंच असू शकतो ? असाही सवाल नवाब मलिक यांनी केला. एनसीबी पत्रकार परिषद घेऊन याचा खुलासा करावा. एनसीबीसोबत दिसणारे फ्लेचर पटेल हे राजकीय पक्षाच्या चित्रपट संघटनेचे सदस्य आहेत. त्यामुळे समीर वानखेडे हे फिल्म इंडस्ट्रीला टार्गेट करत आहेत का ? असाही सवाल नवाब मलिक यांनी केला. मलिक यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर छायाचित्रे आणि पंचनामा कागदपत्रे प्रसिद्ध केली. यात त्यांनी फ्लेचर पटेल नावाच्या व्यक्तीला पंच म्हणून वापरण्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.