मुंबई Buddha Vihara in Mumbai : जपानी निचिरेन पंथाचे फुजी गुरुजी १९३१-३८ दरम्यान भारतात आले असता भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी वरळी येथे टेकडीखाली बुद्ध विहार (Buddha Vihara) बांधलं. सन १९५० च्या दरम्यान याच्या नूतनीकरणाचं काम सुरू झालं आणि दोन वर्षात पूर्ण झाले होते. नवीन आकर्षक चैत्यगृहासारखे बुद्ध विहार बांधण्या आले होते. त्यावेळी उद्योगपती जुगल किशोर बिर्ला यांनी मदत केली होती. या विहाराच्या नूतनीकरणाचं काम चालू असताना स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांनी येथे भेट दिली होती. तसंच त्यांनी येथे सभा देखील घेतली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्धविहार : सन १९५० च्या दरम्यान भारतीय संविधानाचं काम पूर्ण होताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदू कोड बिलाच्या मागे लागले होते. २ जानेवारी १९५० रोजी ते दिल्लीवरून मुंबईस परतले होते. त्यावेळी विमानतळावर त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं होतं. त्याच दिवशी संध्याकाळी मुंबई प्रदेश शेड्युल कास्ट फेडरेशनतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला होता. २९ जानेवारी १९५० रोजी महाराष्ट्र मंडळ आणि इतर मराठी संस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर १४ एप्रिल १९५० रोजी त्यांचा जन्मदिवस सर्व भारतभर साजरा करण्यात आला होता. २५ मे १९५० रोजी ते विमानाने कोलंबो (सिलोन) येथे गेले होते. तिथे त्यांनी भारतातील बौद्धधर्म या विषयावर भाषण दिलं होतं. तिथून येताना त्रिवेंद्रम आणि मद्रास येथे त्यांनी भेटी दिल्या. त्यानंतर दिनांक २९ सप्टेंबर १९५० रोजी त्यांनी वरळी येथील बुद्ध विहारात भाषण दिलं आणि लोकांना बौद्धधर्म स्वीकारण्याचं आवाहन केलं होतं. तसंच बौद्ध धर्माच्या पुनरुत्थनासाठी आणि प्रसारासाठी यापुढील आयुष्य व्यतीत करीन असं त्यांनी जाहीर केलं होतं. ते हेच बुद्ध विहार आहे, जे नूतनीकरणानंतर जपानी बुद्ध विहार म्हणून प्रसिद्ध झालं आहे.
अनुयायांसाठी प्रेरणास्थान : ही एक आता पवित्र ऐतिहासिक वारसा वास्तू आहे, जिथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झाला आहे. त्यानंतर पुन्हा १३ महिन्यांनी म्हणजे दिनांक २२ डिसेंबर १९५१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईत वरळीला आले होते. तेव्हा या नवीन बुद्धविहारात येऊन बुद्ध वंदना करून बौद्ध धर्मा संबंधी भाषण दिल्याचा उल्लेख आढळतो. याप्रमाणे वरळीच्या बुद्ध विहारात त्यांनी २९ सप्टेंबर १९५० आणि २२ डिसेंबर १९५१ साली बुद्ध वंदना करून भाषण दिल्यानं हे विहार बौद्ध बांधवासाठी एक प्रेरणास्थान झाल्याचं दिसून येतं.
बुद्धांच्या जीवनावर आधारित मोठी तैलचित्रे : सद्यस्थितीत या विहाराची अंतर्गत देखभाल जपानची 'निप्पोन्झान म्योहोजी' ही संस्था करते. १९७६ मध्ये जपानचे भिक्खू 'टी मोरिता' येथे आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या विहारात दररोजची वंदना आणि पोर्णिमेचे कार्यक्रम घेण्यात येतात. या विहारात बुद्धांच्या जीवनातील प्रसंगावर आधारित मोठी तैलचित्रे असून अनेक वर्षांनी देखील त्यांची चकाकी कमी झालेली नाही. येथील बुद्धमूर्ती ही अलौकिक कारागिरीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. बुद्धमूर्तीची प्रसन्न मुद्रा पाहताच सर्वकाही विसरून नवचैतन्य प्राप्त झाल्याचा आनंद मिळतो.
हेही वाचा -
- महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत सुट्टी जाहीर, अनुयायांसाठी रेल्वेकडून देण्यात येणार 'या' विशेष सेवा!
- महापरिनिर्वाण दिन; कोल्हापुरातील 'या' गावात आहेत डॉ आंबेडकरांच्या अस्थी, 6 डिसेंबरला घेता येणार दर्शन
- Meditation Center In Melghat : मेळघाटात ध्यान साधना; बारा वर्षात आठ हजार धम्मचाऱ्यांनी घेतलं प्रशिक्षण